महाराष्ट्राचे दोन्ही खो-खो संघ उपांत्य फेरीत

  • By admin
  • January 30, 2025
  • 0
  • 14 Views
Spread the love

हल्दवानी : गतविजेत्या महाराष्ट्राचया पुरुष व महिला खो-खो संघांनी हल्दवानी येथे सुरू असलेल्या ३८ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत कर्नाटकचा धुव्वा उडवत उपांत्य फेरीत धडक दिली. महाराष्ट्राच्या पुरुष संघाने एक डाव १२ गुणांनी बाजी मारली, तर महिलांनी ६ गुणांनी विजय मिळवित आगेकूच केली.

पुरुष खोखो गटात महाराष्ट्रने कर्नाटकवर एक डाव १२ गुणांनी (३४-२२) मात केली. विजयी संघाकडून कर्णधार गजानन शेंगाळ (२.३० मि. संरक्षण व २ गुण), शुभम थोरात (१.४० मि., २.०५ मि. संरक्षण व ६ गुण), रामजी कश्यप (१.३५ मि. संरक्षण व ६ गुण), सौरभ आडावकर (१.४५ मि. संरक्षण व २ गुण) यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. कर्नाटककडून संघाप्पा (१.१० मि. संरक्षण व २ गुण), गौतम एम. के (६ गुण) यांनी दिलेली झुंज अपयशी ठरली.

महिला गटात झालेल्या चुरशीच्या सामन्यात महाराष्ट्राने कर्नाटक संघावर ६ गुणांनी (३२-२६) मात केली. महाराष्ट्रच्या विजयात प्रियांका इंगळे (२ मि. संरक्षण व २ गुण), संध्या सुरवसे (२ मि. व १.२० मि. संरक्षण व ४ गुण), संपदा मोरे (०.५० मि. संरक्षण व १६ गुण), गौरी शिंदे (१.३० मि., १.४० मि. संरक्षण व २ गुण), अश्विनी शिंदे (१.३० मि., १.३० मि. संरक्षण) यांनी मोलाची कामगिरी बजावली. तर कर्नाटककडून मोनिका (१.२० मि., १.४० मि. संरक्षण व ६ गुण), चित्रा बी. (२.१० मि. संरक्षण व ४ गुण), तेजस्विनी के. आर. (१.३० मि. व १.२० मि. संरक्षण) यांनी चांगला खेळ केला. मात्र, त्यांना महाराष्ट्राचा विजयरथ रोखण्यात यश आले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *