
वरोरा : वरोरा स्पोर्ट्स फाउंडेशन वरोरा आणि लोक शिक्षण संस्था वरोडा यांचे संयुक्त विद्यमाने खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या स्मरणार्थ अखिल भारतीय खासदार चषक पुरुष व महिला व्हॉलिबॉल स्पर्धेचे आयोजन १८ ते २० फेब्रुवारी या कालावधीत लोकमान्य महाविद्यालयाचे मैदानावर करण्यात आले आहे.
या स्पर्धेकरिता विद्युत प्रकाश झोतातील दोन मैदाने तयार करण्यात आले आहेत. खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या पुढाकाराने होणाऱ्या या स्पर्धेमध्ये पुरुष गटात प्रथम पुरस्कार १ लाख रुपये रोख व चषक, द्वितीय पुरस्कार ७५ हजार रुपये रोख व चषक, तृतीय पुरस्कार ५० हजार रुपये रोख चषक, चतुर्थ पुरस्कार २५ हजार रुपये रोख व चषक तसेच महिला विभागात प्रथम पुरस्कार ७५ हजार रुपये रोख व चषक, द्वितीय पुरस्कार ५० हजार रुपये रोख व चषक, तृतीय पुरस्कार २५ हजार रुपये चषक, चतुर्थ पुरस्कार १५ हजार रुपये चषक तसेच इतर वैयक्तिक रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत.
या स्पर्धेमध्ये बंगाल, ओडिशा, तेलंगणा, तामिळनाडू, केरळ, मध्य प्रदेश, पंजाब, गुजरात व महाराष्ट्र राज्यातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा समावेश असलेले नामांकित पुरुष व महिला संघ सहभागी होत आहेत.
या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी लोकशिक्षण संस्था वरोडाचे अध्यक्ष प्रा श्रीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनात आयोजन समितीचे अध्यक्ष मानस धानोरकर व वरोरा स्पोर्ट्स फाऊंडेशन वरोराचे अध्यक्ष गजानन जीवतोडे यांच्या नेतृत्वात आयोजन समितीचे पदाधिकारी कार्यकर्ते व खेळाडू परिश्रम घेत आहेत, अशी माहिती स्पर्धा प्रसिद्धी प्रमुख आणि छत्रपती संभाजीनगर विभागाचे महाराष्ट्र राज्य व्हॉलिबॉल संघटनेचे विभागीय सचिव डॉ आबासाहेब शिरसाठ यांनी दिली आहे.