
छत्रपती संभाजीनगर : जयपूर (राजस्थान) येथे झालेल्या राष्ट्रीय मास्टर्स स्पर्धेत छत्रपती संभाजीनगरच्या राजेश भोसले याने दोन कांस्य पदकांची कमाई केली. राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते राजेश भोसले यांचा गौरव करण्यात आला.

संयुक्त भारत खेळ फाऊंडेशन व मास्टर्स गेम्स यांच्या संयुक्त विद्यमाने जयपूर येथील सवाई मानसिंग स्टेडियम मध्ये आयोजित जलतरण व अॅथलेटिक्स राष्ट्रीय मास्टर्स क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत वरिष्ट जलतरणपटू व ॲथलिट राजेश भोसले याने दोन कांस्य पदकांची कमाई केली आहे.
या राष्ट्रीय स्पर्धेत भारतातील २२ राज्यातील खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. जिल्हा परिषद प्रशाला अंबेलोहळचे क्रीडा शिक्षक तसेच एमजीएम स्पोर्ट्स क्लबचे जलतरणपटू व प्रशिक्षक तसेच जागतिक जलतरण साक्षरतेची संकल्पना मांडणारे राजेश भोसले यांनी पन्नास वर्षांवरील वयोगटामध्ये सहभाग घेतला. गोळा फेक प्रकारात १२.८६ मीटर गोळा फेक करुन तृतीय क्रमांक पटकावला. या स्पर्धेत प्रथम करण सिंग (पंजाब) व द्वितीय मोहन लाल (हरियाणा) यांनी यश संपादन केले. जलतरणामध्ये ४०० मीटर फ्री स्टाईल मध्ये ६.२२ सेकंदाची वेळ नोंदवित राजेश भोसलेने कांस्य पदक जिंकले. केरळच्या ॲलेक्सने सुवर्ण तर रामचंद्र राव (आंध्र प्रदेश) याने रौप्यपदक पटकावले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, शिक्षण उपसंचालक
बी बी चव्हाण, शिक्षण अधिकारी प्राथमिक जयश्री चव्हाण, शिक्षण अधिकारी अश्विनी लाटकर, विस्तार अधिकारी समाधान अराक, सुनीता सावळे-नवले, अनिलकुमार सकदेव, मुख्याध्यापक आर आर दुम्मलवार, गोपालकृष्ण नवले, महेंद्रसिंग पाटील, प्रशांत हिवर्डे, जितेंद्र पाटील, रावसाहेब पिठले आदींनी अभिनंदन केले आहे.