
मुंबई : उत्तराखंड राज्यात सुरू असलेल्या ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी तायक्वांदो खेळाचे आंतरराष्ट्रीय पंच तुषार तानाजी सिनलकर यांची तांत्रिक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
तुषार सिनलकर यांना त्यांच्या उत्कृष्ट योगदानाबद्दल ‘अभिमान महाराष्ट्राचा – महाराष्ट्र राज्य पुरस्कार : सर्वोत्कृष्ट प्रशिक्षक’ हा पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला आहे. तुषार सिनलकर यांनी आपल्या खेळातील कामगिरीने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळवला आहेच, पण ते केवळ स्वतःच यशस्वी होण्यापेक्षा आपले खेळाडू, प्रशिक्षक आणि राष्ट्रीय पंचांनाही पुढे घेऊन जाणारे मार्गदर्शक ठरले आहेत. त्यांच्या कुशल प्रशिक्षणामुळे अनेक खेळाडूंनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी केली आहे. त्यांचेच एक उत्कृष्ट विद्यार्थी प्रेम पाटणे यांनीही उल्लेखनीय यश संपादन करत ‘अभिमान महाराष्ट्राचा – महाराष्ट्र राज्य पुरस्कार २०२५ : सर्वोत्कृष्ट खेळाडू’ हा सन्मान पटकावला आहे. हा पुरस्कार मिळवणारे प्रेम पाटणे आणि त्यांचे प्रशिक्षक तुषार सिनलकर या दोघांची जोडी महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानास्पद ठरली आहे.
तुषार सिनलकर यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे सरचिटणीस व इंडिया तायक्वांदोचे अध्यक्ष नामदेव शिरगावकर, तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष संदीप ओंबासे, सचिव गफ्फार पठाण, खजिनदार डॉ प्रसाद कुलकर्णी तसेच गुरुकुल तायक्वांदो अकॅडमीच्या संपूर्ण प्रशिक्षक आणि खेळाडू परिवाराने त्यांचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.