
नागपूर : अभिषेक शर्मा आणि यशस्वी जैस्वाल यांच्याशी माझी कोणत्याही प्रकारची स्पर्धा नाही. अभिषेक हा माझा बालपणीचा मित्र आहे आणि यशस्वी देखील माझा मित्र आहे असे भारतीय संघाचा मधल्या फळीतील फलंदाज शुभमन गिल याने स्पष्ट केले.
अभिषेक शर्माच्या अलीकडील कामगिरीबद्दल युवा भारतीय सलामीवीर शुभमन गिलने आनंद व्यक्त केला. गिल म्हणाला की, ‘खेळाडू एकमेकांच्या यशाने प्रोत्साहित होतात. इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला सुरुवात होण्यापूर्वी मंगळवारी भारतीय संघाचा उपकर्णधार शुभमन गिलने माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्याने यशस्वी जैस्वाल (कसोटी) आणि अभिषेक शर्मा (टी २०) यांच्या वाढत्या उंचीबद्दल आनंद व्यक्त केला.
नागपूरमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना अभिषेक आणि यशस्वी यांच्या वाढत्या उंचीबद्दल विचारले असता शुभमन गिल याने सांगितले की त्यांच्यात कोणत्याही प्रकारची स्पर्धा नाही. गिल म्हणाला की, ‘अभिषेक माझा बालपणीचा मित्र आहे. जैस्वाल देखील माझा मित्र आहे. मला वाटत नाही की आमच्यात काही स्पर्धा आहे. अर्थात, जर तुम्ही देशासाठी खेळत असाल, तर तुम्हाला प्रत्येक सामन्यात चांगली कामगिरी करायची असते आणि तुम्हाला असे वाटत नाही की ‘या मुलाने चांगली कामगिरी केली नसती तर बरे झाले असते’. तुम्ही देशासाठी आणि संघासाठी खेळत आहात आणि जो कोणी चांगली कामगिरी करतो, तुम्हाला त्याच्याबद्दल चांगले वाटते, तुम्ही त्याचे अभिनंदन करता.’
शुभम गिल याला जुलै २०२४ मध्ये भारताकडून शेवटचा टी२० आंतरराष्ट्रीय सामना खेळताना दिसला होता. तो भारताच्या टी-२० विश्वचषक संघाचा भाग नव्हता, त्याला राखीव खेळाडू म्हणून संघात समाविष्ट करण्यात आले होते.
यावेळी गिल याने उपकर्णधार पदाबद्दल सांगितले. माझ्यावर एक अतिरिक्त जबाबदारी सोपवण्यात आली आहे, असे २५ वर्षीय फलंदाज म्हणाला. माझ्या कामगिरीच्या बाबतीत, मी नेतृत्व करणे हे एक आव्हान म्हणून स्वीकारतो. अर्थात, जर रोहित भाईंना मैदानावर माझे मत हवे असेल, तर माझे विचार मांडणे आणि खेळाच्या परिस्थितीबद्दल माझे मत मांडणे हे माझे कर्तव्य आहे असे मला वाटते.’
गिलला चॅम्पियन्स ट्रॉफी तसेच ६ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या इंग्लंड मालिकेसाठी भारतीय संघाचा उपकर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. त्याने आतापर्यंत खेळलेल्या ४७ एकदिवसीय सामन्यांमध्ये १०१.७४ च्या स्ट्राईक रेटने २३२८ धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर सहा शतके आणि १३ अर्धशतके आहेत.
गिल पुढे म्हणाला की, ‘थिंक टँकचा भाग असल्याने, जीजी (गंभीर) भाई कसे विचार करतात आणि रोहित भाई कसे विचार करतात, काही फलंदाजांसाठी, काही गोलंदाजांसाठी आणि काही प्रतिस्पर्ध्यांसाठी काय योजना आहेत, मला वाटते की हे शिकणे माझ्यासाठी एक उत्तम गोष्ट आहे आणि मी तेच करण्याचा प्रयत्न करेन.’
यावेळी शुभमन गिलने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या संघाच्या कामगिरीचा बचाव करताना म्हटले की, एक वाईट मालिका संघाची व्याख्या करत नाही आणि दीर्घ कालावधीनंतर इतक्या खराब कामगिरीनंतर संघावर टीका करणे अन्याय्य आहे. तो म्हणाला- एक मालिका संपूर्ण संघाची लय परिभाषित करत नाही. भूतकाळात अनेक मालिका आणि स्पर्धांमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करणारे अनेक खेळाडू आहेत. ऑस्ट्रेलियामध्ये आम्ही आमच्या अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही यात शंका नाही. तथापि, आम्ही काही चांगले क्रिकेट देखील खेळलो. त्या दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी संघाला नशीब लाभले नाही कारण (जसप्रीत) बुमराह जखमी झाला होता. जर आम्ही तो सामना जिंकला असता तर मालिका बरोबरीत सुटली असती आणि आम्ही ट्रॉफी कायम ठेवली असती. अशा परिस्थितीत, अशा गोष्टी सध्या घडत नसतील.’