
५० मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये अंतिम फेरीत
डेहराडून : ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या महाराष्ट्राच्या स्वप्नील कुसाळे याने ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील नेमबाजीच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये अपेक्षेप्रमाणे अंतिम फेरी गाठली. गुरुवारी सकाळी १० वाजता अंतिम फेरीचा थरार रंगणार आहे.
महाराणा प्रताप क्रीडा संकुलातील त्रिशूल शूटिंग रेंजवर सुरू असलेल्या या स्पर्धेत कोल्हापूरच्या स्वप्नील कुसळे याने एकूण ५८८ गुणांची कमाई करीत पाचव्या क्रमांकाने अंतिम फेरी गाठली. त्याने नीलिंग (गुडघ्यावर बसून) पोझिशनमध्ये १९५, प्रोन (झोपून) पोझिशनमध्ये २००, तर स्टॅडींग (उभे राहून) पोझिशनमध्ये १९३ अशी एकूण ५८८ गुणांची कमाई करीत अंतिम फेरीची पात्रता मिळविली.
पात्रता फेरीत मध्यप्रदेशच्या प्रताप सिंग तोमरने ५९८ गुणांसह अव्वल स्थान मिळविले. चैन सिंग (५९४), नीरज कुमार (५९१) व निशान बुधा (५८९) या सर्व्हिसेसच्या नेमबाजांनी अनुक्रमे दुसर्या, तिसर्या व चौथ्या क्रमांकासह अंतिम फेरीचे तिकीट बुक केले.
आशियाई स्पर्धेतील सुवर्णपदक विजेती व दोन वेळची ऑलिम्पियन नेमबाज असलेल्या राही सरनोबत कडून महाराष्ट्राला पदकाच्या अपेक्षा होत्या. मात्र, महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात ही कोल्हापूरची सुकन्या चौथ्या स्थानावर राहिल्याने चाहत्यांची निराशा झाली.