३० वर्षांनंतर मनमाड येथे राज्य कबड्डी चॅम्पियनशिप रंगणार

  • By admin
  • February 6, 2025
  • 0
  • 9 Views
Spread the love

२३ ते २७ फेब्रुवारी दरम्यान आयोजन

मुंबई : महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या विद्यमाने २३ ते २७ फेब्रुवारी या कालावधीत ३५व्या किशोर आणि किशोरी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

मनमाड येथील श्री गुरू गोविंद सिंह हायस्कूल शेजारील हॅलीपॅड मैदानावर मॅटच्या ४ क्रीडांगणावर हे सामने होणार आहेत. सामने सकाळ व सायंकाळ या दोन्ही सत्रात खेळविले जातील. या स्पर्धेतून महाराष्ट्राचा किशोर व किशोरी गटाचा संघ निवडण्यात येईल. हा निवडण्यात आलेला संघ काश्मीर येथे होणाऱ्या किशोर आणि किशोरी गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करेल.

या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व जिल्हा संघाना सूचित करण्यात येते की त्यांनी आपले किशोरी (मुली) गटाचे संघ २२ फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत स्पर्धेच्या ठिकाणी दाखल होतील याची दक्षता घ्यावी. त्याच दिवशी सर्व संघांची छाननी केली जाईल. २३ व २४ फेब्रुवारी या दोन दिवसात साखळी सामने व उप उपांत्यपूर्व आणि उपांत्यपूर्व सामने खेळविले जातील. तसेच किशोर (मुले) गट संघानी २४ फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत आपली उपस्थिती नोंदवावी. त्यांची छाननी त्याच दिवशी करण्यात येईल. मुलांचे सामने २५ व २६ या दोन दिवसांत खेळविण्यात येतील. दोन्ही गटाचे उपांत्य व अंतिम सामने २७ फेब्रुवारी रोजी सायंकाळच्या सत्रात खेळविण्यात येतील.

३० वर्षांनंतर मनमाडला हे सामने पुन्हा होत आहेत. जय भवानी मंडळाच्या सहकार्याने १९९५ साली मनमाड येथे किशोर गटाचे सामने झाले होते. त्यानंतर मनमाडकरांना हा मान मिळाला आहे. सर्व खेळाडूंच्या निवासाची व्यवस्था गुरुद्वारामार्फत करण्यात आली आहे. या स्पर्धेला आमदार सुहास कांदे, आमदार मुक्ती मोहम्मद इस्माईल, आमदार किशोर दराडे, आमदार सत्यजित तांबे आदींचे सहकार्य लाभले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *