
मिश्र दुहेरीत राही सरनोबत आणि प्रवीण पाटीलला कांस्य
देहरादून : ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता नेमबाज स्वप्नील कुसाळे याने ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पिछाडीवरून जोरदार मुसंडी मारत महाराष्ट्राला कांस्यपदक जिंकून दिले. याचबरोबर राही सरनोबत व प्रवीण पाटील या जोडीने मिश्र दुहेरीच्या एकतर्फी लढतीत बाजी मारत महाराष्ट्राला आणखी एक कांस्यपदक जिंकून दिले.
त्रिशूल शूटिंग रेंजवर गुरुवारी संपलेल्या नेमबाजी स्पर्धेत अखेरच्या दिवशी महाराष्ट्राची दोन कांस्यपदकाने सांगता झाली. ऑलिम्पिक पदकविजेत्या स्वप्नील कुसाळेने सुरुवातीच्या संघर्षानंतर स्वत:ला सावरत पुरुषांच्या ५० मिटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात ४४७.७ गुणांसह कांस्यपदकाला गवसणी घातली. सेनादलाच्या नीरज कुमारने एकूण ४६४.१ गुणांसह सुवर्णपदकावर मोहोर उमटवली, तर मध्य प्रदेशचा प्रताप सिंग तोमर ५६२.४ गुणांसह रौप्यपदकाचा मानकरी ठरला.
स्वप्नील कुसाळेची सुरुवात समाधानकारक झाली नाही. थ्री पोझिशनच्या नीलिंग (गुडघ्यावर बसून) प्रकारात स्वप्नीलची दहाव्या शॉट पर्यंत अखेरच्या स्थानावर घसरण झाली. त्यानंतर प्रोन प्रकारातही २५व्या शॉटपर्यंत तो अखेरच्याच स्थानावर होता. त्यानंतर स्वप्नीलने कामगिरीत सुधारणा करीत ३०व्या शॉटपर्यंत दोन स्थानाने प्रगती करीत सहावे स्थान गाठले, तर ३५व्या शॉटपर्यंत थेट तिसऱ्या स्थानी मुसंडी मारताच महाराष्ट्राच्या पदकाच्या आशा पल्लवित केल्या. इलिमिनेशनचा थरार सुरू झाल्यानंतर स्वप्नीलने अचूक वेध घेत किमान कांस्यपदक, तरी हातातून निसटणार नाही, याची काळजी घेतली.
राही आणि प्रवीणची एकतर्फी बाजी
राही सरनोबत आणि प्रवीण पाटील या महाराष्ट्राच्या जोडीने १० मिटर एअर पिस्तूल मिश्र दुहेरीच्या एकतर्फी लढतीत यजमान उत्तराखंडच्या जोडीचा १७-३ असा धुव्वा उडवून कांस्यपदक जिंकले. १० फेऱ्यांचा या लढतीत राही – प्रवीण या जोडीने सहज बाजी मारली. नवख्या उत्तराखंडच्या जोडीचा पराभव झाला असला, तरी त्यांनी इथपर्यंत मजल मारून उपस्थितांची मने जिंकली.
‘तयारीला फारसा वेळ मिळाला नाही’
प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास यंदाच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी तयारी करण्यास फारसा वेळच मिळाला नाही. ऑलिम्पिकवरून परतल्यानंतर सत्कार समारंभ, मग द्रोणाचार्य पुरस्कार मिळाल्यानंतर त्यात काही दिवस गेले. अल्पशा तयारीनिशी येऊन पदक जिंकले. मात्र, या कांस्यपदकावर मी समाधानी नाहीये. आता नवीन रायफल घेऊन मग आगामी ऑलिम्पिकच्या तयारीवर लक्ष केंद्रित करायचे आहे. ऑलिम्पिक पदकाचा रंग बदलणे हेच माझे मुख्य ध्येय होय अशी प्रतिक्रिया स्वप्नील कुसाळे याने व्यक्त केली.
स्वप्नील ठरला मुख्य आकर्षण
ऑलिम्पिक पदक विजेत्या स्वप्नील कुसाळेला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले, तरी तोच या स्पर्धेत मुख्य आकर्षण ठरला. त्याच्यासोबत फोटो काढण्यासाठी चाहत्यांची झुंबड उडाली होती. उत्तराखंडच्या दोन-तीन मंत्र्यांसह अनेक पदाधिकाऱ्यांचाही त्यामध्ये समावेश होता.