ऑलिम्पियन आणि वर्ल्ड चॅम्पियन खेळाडूंना नमवत महाराष्ट्राचा दुहेरी सुवर्णवेध

  • By admin
  • February 6, 2025
  • 0
  • 31 Views
Spread the love

 गाथा, सुखमणी, वैष्णवी, शर्वरी आणि मुक्ताने पटकावले सुवर्णपदक

देहरादून : महाराष्ट्राच्या तिरंदाजांनी ऑलिम्पियन आणि वर्ल्ड चॅम्पियन खेळाडूंच्या   झारखंड संघाला नमवत ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत रिकर्व्ह प्रकारात गुरुवारी दोन सुवर्णपदके जिंकून धमाका केला.

गाथा खडके व सुखमणी बाबरेकर जोडीने शूट ऑफपर्यंत ताणलेल्या रिकर्व्ह मिश्र दुहेरीच्या लढतीत बाजी मारत सुवर्ण पदक जिंकले. तसेच गाथा खडके, वैष्णवी पवार व शर्वरी शेंडे या त्रिकुटाने रिकर्व्ह महिलांच्या सांघिक प्रकारात सुवर्ण पदकाला गवसणी घातली.

राजीव गांधी क्रिकेट स्टेडियममध्ये ही स्पर्धा सुरू आहे. गाथा खडके व सुखमणी बाबरेकर जोडीने हरियाणाच्या पारस हुडा व भजन कौर या जोडीला तोडीस तोड लढत दिली. उभय जोड्यांमध्ये एक एक गुणासाठी पाठशिवणीचा खेळ रंगला होता. शेवटी ही लढत ४-४ अशी बरोबरीत सुटल्याने शूट ऑफ मध्ये गेली. शूट ऑफमध्ये वन ॲरो शुटमध्ये विजय प्रस्थापित करत सुवर्ण पदक पटकाविले. झारखंडच्या जोडीने ९,९ असा वेध घेतला. मग गाथानेही ९ गुणांचाच वेध घेतल्याने महाराष्ट्राची धाकधूक वाढली होती. मात्र, बाबरेकरने मोक्याच्या वेळी १० गुणांचा वेध घेत महाराष्ट्राला सुवर्णपदक जिंकून दिले.

गाथा खडके, वैष्णवी पवार, शर्वरी शेंडे व मुक्ता मोडगी यांनी सांघिक महिला गटातून झारखंडच्या दीपिका कुमारी, अंकिता भगत व कोमालिका बारी या स्टार खेळाडूंनी सजलेल्या संघाचा ६-१ फरकाने पराभव करून महाराष्ट्राच्या झोळीत सुवर्णपदक टाकले. या संघास समीर म्हस्के यांनी मार्गदर्शक म्हणून काम पाहिले. महाराष्ट्राने ही दोन सुवर्णपदके जिंकल्यानंतर महाराष्ट्राचे खेळाडू व चाहत्यांनी “जय शिवाजी, जय भवानी’, ‘जय महाराष्ट्र टीम महाराष्ट्र’ अशा घोषणा देत मैदान दणाणून सोडले.

आजच्या सुवर्ण कामगिरी केल्याबद्दल महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार, सचिव नामदेव शिरगावकर, पथक प्रमुख संजय शेटे, उपपथक प्रमुख सुनील पूर्णपात्रे आदींसह संघटनेचे पदाधिकारी खेळाडू आणि क्रीडाप्रेमींनी अभिनंदन केले आहे.

झारखंड संघावर दडपण : गाथा खडके 
‘झारखंडच्या संघात दोन ऑलिम्पियन व एक वर्ल्ड चॅम्पियन खेळाडूचा समावेश होता. त्यामुळे आमच्याकडे गमावण्यासारखे काहीच नव्हते. उलट झारखंडच्या संघावर दडपण होते. म्हणून आम्ही कुठलेही दडपण न सुवर्ण पदकाच्या लढतीत फक्त नैसर्गिक खेळ करावा, असा कानमंत्र प्रशिक्षकांनी दिला होता. योजनेनेसार खेळ झाला अन् आम्ही दोन सुवर्णपदके जिंकण्यात यशस्वी ठरलो. मी वयाच्या आठव्या वर्षापासून तिरंदाजी खेळत आहे. मला या खेळाच्या मोठ्या व्यासपीठावर आणण्यात रणजित चामले सरांचा मोठा आहे. त्यांच्यासह विलास ढुमने व सागर सावंत यांचे मार्गदर्शन लाभले आहे, अशी प्रतिक्रिया गाथा खडके हिने व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *