
डीपीएल सिझन ९ : कन्नैया, अविनाश, मेहबूब शेख, सिद्धार्थ कटारिया, आसिफ बियाबानी, मयूर सामनावीर
छत्रपती संभाजीनगर : संभाजीनगर नॅशनल डीपीएल सिझन ९ स्पर्धेत दुसऱ्या दिवशी झालेल्या सामन्यांमध्ये थुंगा हॉस्पिटल्स, हैदराबाद स्पार्टन्स, हैदराबाद स्टॅलियन्स, आयकॉन हॉस्पिटल्स आणि छत्रपती किंग्ज या संघांनी दणदणीत विजयासह आगेकूच कायम ठेवली. या लढतींमध्ये कन्नैया, अविनाश, के मेहबूब शेख, सिद्धार्थ कटारिया, डॉ आसिफ बियाबानी व डॉ मयूर जे यांनी सामनावीर किताब संपादन केला.
पहिल्या सामन्यात थुंगा हॉस्पिटल्स संघाने एससीबी नाशिक संघावर दहा गडी राखून मोठा विजय नोंदवला. एससीबी नाशिक संघाने प्रथम फलंदाजी करत १९ षटकात सर्वबाद ११० धावा काढल्या. थुंगा हॉस्पिटल्स संघाने अवघ्या ९.५ षटकात बिनबाद १११ धावा फटकावत दहा विकेट राखून सामना जिंकला. या सामन्यात के मेहबूब शेख याने ३० चेंडूत ५० धावांची धमाकेदार खेळी साकारली. त्याने एक षटाकर व नऊ चौकार मारले. डॉ सतीश रेड्डी याने २९ चेंडूत चार षटकार व चार चौकारांसह ५२ धावांची बहारदार खेळी साकारली. डॉ अमोल पवार याने तीन चौकारांसह २२ धावांचे योगदान दिले. गोलंदाजीत अमित पाल (३-१३), डॉ विनोद राज (२-२६) व सुरेश पाटील (१-८) यांनी प्रभावी स्पेल टाकला.
दुसऱ्या सामन्यात हैदराबाद स्पार्टन्स संघाने केम मार्डरर्स संघाचा आठ विकेट राखून पराभव केला. केम मार्डरर्स संघाने प्रथम फलंदाजी करत २० षटकात नऊ बाद १३१ धावा काढल्या. प्रत्युत्तरात हैदराबाद स्पार्टन्स संघाने १२.४ षटकात दोन गडी गमावून १३५ धावा फटकावत आठ विकेट राखून मोठा विजय संपादन केला. या सामन्यात अविनाश याने चार षटकार व सहा चौकारांसह ४० चेंडूत ६५ धावांची आक्रमक खेळी साकारली. रोहन मेटकरी याने चार चौकारांसह ४२ चेंडूत ४० धावा फटकावल्या. साई महेश याने १४ चेंडूत आक्रमक २६ धावा फटकावल्या. त्याने सहा चौकार मारले. गोलंदाजीत डॉ किशोर रेड्डी बंडारू याने १७ धावांत दोन गडी टिपले. साई महेश (१-११) व डॅनी (१-२१) यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
तिसऱ्या सामन्यात हैदराबाद स्टॅलियन्स संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात पाच बाद २३१ असा धावांचा डोंगर उभारला. या धावसंख्येचा पाठलाग करताना आयएमए अमरावती संघ २० षटकात नऊ बाद १०५ धावा काढू शकला. हैदराबाद स्टॅलियन्स संघाने १२६ धावांनी सामना जिंकला. या लढतीत कन्नैया याने अवघ्या ५३ चेंडूत ९८ धावाची वादळी खेळी करत सामनावीर किताब पटकावला. त्याने आपल्या वादळी खेळीत सात टोलेजंग षटकार व नऊ खणखणीत चौकार मारले. डॉ किरण कुमार याने २० चेंडूत ५४ धावांची धमाकेदार अर्धशतकी खेळी साकारली. त्याने तीन उत्तुंग षटकार व सहा चौकार मारले. डॉ उदयकांत याने २३ चेंडूत ३० धावांची आक्रमक खेळी केली. त्यात त्याने दोन षटकार व दोन चौकार मारले. गोलंदाजीत डॉ महेंद्र (३-१५), किरण कुमार (२-११) व कन्नैया (२-२९) यांनी प्रभावी कामगिरी बजावली.
चौथ्या सामन्यात थुंगा हॉस्पिटल्स संघाने एससीबी नाशिक संघाचा सात विकेट राखून पराभव केला. एससीबी नाशिक संघाने प्रथम फलंदाजी करताना १९ षटकात नऊ बाद १२२ धावा काढल्या. थुंगा हॉस्पिटल्स संघाने केवळ ९.५ षटकात तीन बाद १२४ धावा फटकावत सात गडी राखून विजय नोंदवला. या लढतीत मनोज ताजी याने ४३ चेंडूत ५६ धावा फटकावल्या. त्याने एक षटकार व सात चौकार मारले. सिद्धार्थ कटारिया याने २३ चेंडूत ५१ धावांची घणाघाती अर्धशतक ठोकले. त्याने तीन उत्तुंग षटकार व पाच चौकार मारले. अबिद इमाम याने १५ चेंडूत ३१ धावांची आक्रमक खेळी केली. त्याने सात चौकार मारले. गोलंदाजीत डॉ चेतन पटेल याने २४ धावांत चार विकेट घेत सामना गाजवला. सिद्धार्थ कटारिया याने २४ धावांत दोन गडी बाद करत सामनावीर पुरस्कार संपादन केला. डॉ सुनील काळे याने १९ धावांत दोन विकेट घेतल्या.
पाचव्या सामन्यात आयकॉन हॉस्पिटल्स संघाने नाशिक मास्टर्स संघाचा ५८ धांवांनी पराभव केला. आयकॉन हॉस्पिटल्स संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात नऊ बाद १४९ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. या धावसंख्येचा पाठलाग करताना नाशिक मास्टर्स संघ २० षटकात ९ बाद ९१ धावा करता आल्या. आयकॉन हॉस्पिटल्स संघाने ५८ धावांनी सामना जिंकला. या सामन्यात प्रणित सोनवणे (४७), मशुदुल सय्यद (३४), डॉ अमर मते (२९) यांनी सुरेख फलंदाजी केली. गोलंदाजीत डॉ असिफ बियाबानी याने ११ धावांत चार विकेट घेत सामना गाजवला. आमेर बदाम (३-१६) व डॉ रोहन उपाध्याय (३-२३) यांनी अप्रतिम गोलंदाजी केली.
सहाव्या सामन्यात छत्रपती किंग्ज संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना २० षटकात पाच बाद १८६ अशी भक्कम धावसंख्या उभारत सामन्यावर वर्चस्व गाजवले. या धावसंख्येचा पाठलाग करताना ठाणे सुपर्ब संघ १७.४ षटकात १३२ धावांत सर्वबाद झाला. छत्रपती किंग्ज संघाने ५४ धावांनी सामना जिंकत आगेकूच कायम ठेवली. या सामन्यात डॉ कार्तिक बाकलीवाल याने ५४ चेंडूत ७४ धावांची धमाकेदार अर्धशतकी खेळी केली. त्याने पाच टोलेजंग षटकार व चार चौकार मारले. एसआर याने एक षटकार व पाच चौकारांसह ४५ धावा फटकावल्या. डॉ रवी महाजन याने तीन चौकारांसह ३३ धावांचे योगदान दिले. गोलंदाजीत डॉ मयूर जे याने ३१ धावांत चार विकेट घेत संघाला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. डॉ रवी महाजन याने २४ धावांत दोन गडी बाद करुन अष्टपैलू कामगिरी नोंदवली. राजेंद्र चोपडा याने २५ धावांत दोन विकेट घेत सुरेख कामगिरी बजावली.