
नंदुरबार : महाराष्ट्र राज्य कबड्डी असोशिएशनच्या मान्यतेने व नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशन आयोजित ३५वी किशोर व किशोरी राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धा मनमाड येथे २२ ते २७ फेब्रुवारी दरम्यान होणार आहे. या स्पर्धेसाठी नंदुरबार जिल्ह्याचा कबड्डी संघ रविवारी (९ फेब्रुवारी) निवडण्यात येणार आहे.
या स्पर्धेत नंदुरबार जिल्हा कबड्डी असोसिएशनचा संघ सहभागी होणार असून सदर स्पर्धेसाठी नंदुरबार जिल्हा निवड चाचणी जिल्हा क्रीडा संकुल येथे ९ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता घेण्यात येणार आहे. सर्व नोंदणीकृत संघ व खेळाडूंनी आणि राज्य संघटनेने मंजुरी दिलेल्या खेळाडूंनी सहभागी व्हावे. नवीन खेळाडूंनी नोंदणीसाठी स्पर्धेच्या ठिकाणी सकाळी १० वाजता उपस्थित रहावे.
या स्पर्धेची निवड चाचणी मॅटवर होणार आहे. किशोर गटासाठी वजन ५५ किलो, जन्मतारीख १ जानेवारी २००९ व त्यानंतरचा जन्म असावा. किशोरी गटासाठी वजन ५५ किलो आणि जन्मतारीख १ जानेवारी २००९ व त्यानंतरचा जन्म असेल अशा खेळाडूंनी जन्मतारखेचा पुरावा म्हणून दहावी व बारावीच्या परीक्षेचे मुळ हॉल तिकीट, बोनाफाईड, स्टुडन्ट आय डी नंबर व फोटोवर मुख्याध्यापक यांची सही व शिक्का आणि शाळेच्या सिलसह असावे. जन्म नोंदणी प्रमाणपत्र, पहिलीचा निर्गम मुळ उतारा, आधार कार्ड ओरिजनल आदी पुरावे असावेत.
स्पर्धा नोंदणी फी सोबत आणावी. या निवड चाचणीस राज्य प्रतिनिधीची उपस्थिती राहणार असून मोठ्या संख्येने खेळाडूंनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा संघटनेचे सचिव प्रा राजेंद्र साळुंखे, कोषाध्यक्ष डॉ मयूर ठाकरे यांनी केले आहे.