
राष्ट्रीय डीपीएल सीझन ९ : विनय सांगळे, सिद्धार्थ कटारिया, डॅनी, ब्रिजेश यादव, कार्तिक बाकलीवाल, आसिफ बियाबानी सामनावीर
छत्रपती संभाजीनगर : संभाजीनगर राष्ट्रीय डीपीएल सीझन ९ टी २० क्रिकेट स्पर्धेत चंद्रा हॉस्पिटल्स, ठाणे सुपर्ब, हैदराबाद स्पार्टन्स, थुंगा हॉस्पिटल्स, छत्रपती किंग्ज आणि आयकॉन हॉस्पिटल्स या संघांनी शानदार विजयासह आपली विजयी आगेकूच कायम ठेवली. या सामन्यांमध्ये डॉ विनय सांगळे, सिद्धार्थ कटारिया, डॅनी, ब्रिजेश यादव, डॉ कार्तिक बाकलीवाल आणि डॉ आसिफ बियाबानी यांनी सामनावीर किताब पटकावला.
शनिवारी झालेल्या पहिल्या सामन्यात ठाणे सुपर्ब संघाने आयएमए अमरावती संघावर १०० धावांनी दणदणीत विजय नोंदवला. ठाणे सुपर्ब संघाने प्रथम फलंदाजी करत २० षटकात नऊ बाद २०३ असा धावांचा डोंगर उभारला. आयएमए अमरावती संघ १८.३ षटकात १०३ धावांत सर्वबाद झाला. ठाणे सुपर्ब संघाने १०० धावांनी सामना जिंकला. या सामन्यात डॉ वरुण म्हात्रे (६९), रशीद रियाझ (२९), तपन कुमार दास (२९) यांनी सुरेख फलंदाजी केली. गोलंदाजीत डॉ विनय सांगळे याने १० धावांत पाच विकेट घेत सामना गाजवला. दिनेश वाघाडे याने २७ धावांत तीन तर तपन कुमार दास याने १९ धावांत दोन गडी बाद केले.
दुसऱ्या सामन्यात चंद्रा हॉस्पिटल्स संघाने एससीबी नाशिक संघाचा सहा विकेट राखून पराभव केला. एससीबी नाशिक संघाने प्रथम फलंदाजी करत १९.५ षटकात सर्वबाद १३२ धावा काढल्या. थुंगा हॉस्पिटल्स संघाने १७.४ षटकात चार बाद १३३ धावा फटकावत सहा गडी राखून सामना जिंकला. या सामन्यात डॉ प्रशांत उतेकर (४८), डॉ ओंकार सदिगळे (३१), आबिद इमाम (३०) यांनी आक्रमक फलंदाजी केली. गोलंदाजीत डॉ अफशीर खान (२-१६), अनिकेत जैन (२-५), डॉ सुबोध कोठुले (१-१९) यांनी प्रभावी कामगिरी बजावली.
तिसऱ्या सामन्यात हैदराबाद स्पार्टन्स संघाने नाशिक मास्टर्स संघावर दोन विकेट राखून विजय संपादन केला. नाशिक मास्टर्स संघाने २० षटकात आठ बाद १४३ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. हैदराबाद स्पार्टन्स संघाने २० षटकात आठ बाद १४४ धावा फटकावत दोन विकेटने सामना जिंकला. या सामन्यात डॉ दिनेश ठाकूर (५७), अविनाश (४७), डॅनी (३३) यांनी धमाकेदार फलंदाजी करत मैदान गाजवले. गोलंदाजीत डॉ सचिन पाटील याने १९ धावांत चार विकेट घेत आपला ठसा उमटवला. डॉ सनी मार्शल (३-२१), डॉ दिनेश ठाकूर (२-३२) यांनी अनुक्रमे तीन व दोन गडी बाद केले.
चौथ्या सामन्यात थुंगा हॉस्पिटल्स संघाने विजयी आगेकूच कायम ठेवत शिवशक्ती वॉरियर्स संघावर दहा विकेट राखून मोठा विजय संपादन केला. शिवशक्ती वॉरियर्स संघाने १३.४ षटकात सर्वबाद ६४ धावा काढल्या. थुंगा हॉस्पिटल्स संघाने अवघ्या ६.१ षटकात बिनबाद ६८ धावा फटकावत दहा विकेट राखून सामना जिंकला. या सामन्यात डॉ सतीश शेट्टी (४३), डॉ इशान ठक्कर (२१) व डॉ महामुनी (१६) यांनी शानदार फटकेबाजीचा खेळ केला. गोलंदाजीत ब्रिजेश यादव (४-१४) याने भन्नाट स्पेल टाकला. अमित पाल (३-५) व नरेंद्र भुमकर (२-४) यांनी प्रभावी गोलंदाजी केली.
पाचव्या सामन्यात छत्रपती किंग्ज संघाने हैदराबाद स्टॅलियन्स संघावर नऊ गडी राखून दणदणीत विजय नोंदवला. हैदराबाद स्टॅलियन्स संघाने प्रथम फलंदाजी करत २० षटकात सात बाद १४८ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. छत्रपती किंग्ज संघाने १६.२ षटकात एक बाद १४९ धावा फटकावत नऊ विकेट राखून मोठ्या फरकाने सामना जिंकत आगेकूच कायम ठेवली. या सामन्यात गिरीश गाडेकर याने ४७ चेंडूत ६२ धावांची धमाकेदार अर्धशतकी खेळी केली. या खेळीत गाडेकर याने दोन षटकार व आठ चौकार मारले. डॉ कार्तिक बाकलीवाल याने ४१ चेंडूत ५३ धावांची आक्रमक खेळी साकारली. त्याने चार उत्तुंग षटकार व पाच चौकार मारले. डॉ आमेर हाश्मी याने १५ चेंडूत ३२ धावांची वादळी खेळी केली. त्याने एक षटकार व पाच चौकार मारले. गोलंदाजीत डॉ मयूर जे याने १५ धावांत तीन गडी बाद करुन आपला प्रभाव कायम ठेवला. डॉ चिराग सिंग (१-२१) व यश (१-१७) यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
सहाव्या सामन्यात आयकॉन हॉस्पिटल्स संघाने केम मार्डरर्स संघाचा …धावांनी पराभव केला. आयकॉन हॉस्पिटल्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारत २० षटकात नऊ बाद १४१ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. प्रत्युत्तरात केम मार्डरर्स संघ १८.२ षटकात १०८ धावांत सर्वबाद झाला. आयकॉन संघाने ३३ धावांनी सामना जिंकत आगेकूच केली. या सामन्यात डॉ अमर मते (३५), डॉ सतीश म्हैसाने (२२) व डॉ तौसिफ खान (२१) यांनी सुरेख फलंदाजी केली. गोलंदाजीत डॉ आसिफ बियाबानी (३-१३), डॉ सफवान खान (२-१६), गौतम (२-२२) यांनी प्रभावी मारा केला.