
हरियाणा संघाविरुद्ध पहिल्या दिवसअखेर आठ बाद २७८ धावा
कोलकाता : शम्स मुलानी (९१) आणि तनुष कोटियन (नाबाद ८५) यांच्या शानदार फलंदाजीमुळे मुंबई संघाने हरियाणा संघाविरुद्ध पहिल्या दिवसअखेर आठ बाद २७८ धावा काढल्या. रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील उपांत्यपूर्व सामन्यात एकवेळ मुंबई संघाची स्थिती पाच बाद ६५ अशी बिकट झाली होती. तनुष कोटियन व शम्स मुलानी या जोडीने आठव्या विकेटसाठी १६५ धावांची भागीदारी करून मुंबईला संकटातून बाहेर काढले.
मुंबई संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणे याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या दोन सत्रात रहाणेचा हा निर्णय मुंबईला महागडा ठरला. मुंबई संघाच्या डावाची सुरुवात अत्यंत खराब झाली. आयुष म्हात्रे (०), आकाश आनंद (१०), सिद्धेश लाड (४) हे आघाडीचे फलंदाज धावफलकावर केवळ १४ धावा असताना तंबूत परतले. या संकट काळात सूर्यकुमार यादवकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. परंतु, त्याचा खराब फॉर्म कायम राहिला. सूर्यकुमार यादव ५ चेंडूत दोन चौकारांसह ९ धावा काढून बाद झाला. त्यावेळी मुंबईची धावसंख्या फक्त २५ होती.
अजिंक्य रहाणे व शिवम दुबे या जोडीने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. शिवम दुबे ३२ चेंडूत २८ धावा काढून बाद झाला. दुबेने एक षटकार व चार चौकार मारले. त्यानंतर अजिंक्य रहाणे देखील बाद झाला. रहाणेने ५८ चेंडूत ३१ धावांचे योगदान दिले. त्यात त्याने पाच चौकार मारले. अष्टपैलू शार्दुल ठाकूर तीन चौकारांसह १५ धावा काढून बाद झाला.
मुंबई संघाची एकवेळ सात बाद ११३ अशी बिकट स्थिती झाली होती. त्यावेळी शम्स मुलानी व तनुष कोटियन या तळाच्या फलंदाजांनी डाव सावरला. आठव्या विकेटसाठी या जोडीने १६५ धावांची भागीदारी करत संघाला संकटातून बाहेर काढले. शम्म मुलानी याने १७८ चेंडूंचा सामना करत ९१ धावांची शानदार खेळी साकारली. त्याने दहा चौकार मारले. तनुष कोटियन याने १५४ चेंडूंचा सामना करत नाबाद ८५ धावा काढल्या आहेत. त्याने अकरा चौकार मारले. मोहित अवस्थी (नाबाद ०) व तनुष कोटियन (नाबाद ८५) ही जोडी खेळत आहे. ८१ षटकाअखेर मुंबईने ८ बाद २७८ धावा काढल्या आहेत.
हरियाणा संघाकडून वेगवान गोलंदाज अंशुल कंबोज याने ५८ धावांत तीन विकेट घेतल्या. सुमित कुमार (२-६३), अनुज ठकराल (१-५९), अजित चहल (१-२१), जयंत यादव (१-२६) यांनी आपले योगदान दिले.