
लिजंड्स प्रीमियर लीग : प्रदीप जगदाळे, रोहन शाह सामनावीर
छत्रपती संभाजीनगर : लिजंड्स प्रीमियर लीग सिझन ३ टी २० लीग क्रिकेट स्पर्धेत रविवारी झालेल्या पहिल्या सामन्यात न्यू एरा संघाने नॉन स्ट्रायकर्स संघाचा २८ धावांनी पराभव केला. दुसऱ्या सामन्यात रोहन रॉयल्स संघाने रोमहर्षक सामन्यात श्लोक वॉरियर्स संघावर तीन विकेट राखून विजय नोंदवला. या सामन्यांमध्ये प्रदीप जगदाळे आणि रोहन शाह यांनी सामनावीर पुरस्कार पटकावला.

एमआयटी क्रिकेट स्टेडियमवर ही स्पर्धा होत आहे. पहिल्या सामन्यात न्यू एरा संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारत २० षटकात पाच बाद १९१ अशी भक्कम धावसंख्या उभारत सामन्यावर वर्चस्व गाजवले. या धावसंख्येचा पाठलाग करताना नॉन स्ट्रायकर्स संघ १९ षटकात १६३ धावांवर सर्वबाद झाला. न्यू एरा संघाने २८ धावांनी सामना जिंकला.

या सामन्यात प्रदीप जगदाळे याने ९२ धावांची वादळी खेळी केली. प्रदीपचे शतक केवळ आठ धावांनी हुकले. प्रदीपने आपल्या वादळी खेळीत ६४ चेंडूंचा सामना करत पाच उत्तुंग षटकार व नऊ चौकार मारले. इरफान पठाण यने ३७ चेंडूंत ४२ धावांची वेगवान खेळी साकारली. इरफानने दोन षटकार व चार चौकार मारले. सारंग सराफ याने २१ चेंडूत ३४ धावांची धमाकेदार खेळी केली. सारंगने तीन षटकार व एक चौकार मारला. गोलंदाजीत प्रदीप जगदाळे याने २१ धावांत तीन विकेट घेत अष्टपैलू कामगिरी बजावली. या कामगिरीमुळे प्रदीप सामनावीर ठरला. शेख सादिक याने १६ धावांत दोन आणि मोहम्मद इम्रान याने १८ धावांत दोन गडी बाद केले.
दुसऱ्या सामन्यात श्लोक वॉरियर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारत २० षटकात तीन बाद १५४ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करताना रोहन रॉयल्स संघाने १९.४ षटकात सात बाद १५५ धावा फटकावत रोमहर्षक सामना तीन विकेट राखून जिंकला.
या सामन्यात सय्यद फरहान (५६), रोहन शाह (४०), प्रवीण क्षीरसागर (३७) यांनी धमाकेदार फलंदाजी केली. प्रवीणने चार उत्तुंग षटकार ठोकले. आमेर बदाम (२-२३), वहाब (२-२६) व रोहन शाह (२-२५) यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. मयंक विजयवर्गीय याने अवघ्या १३ चेंडूत नाबाद २७ धावा फटकावत संघाला रोमांचक विजय मिळवून दिला. त्याने एक षटकार व चार चौकार मारले.
संक्षिप्त धावफलक : १) न्यू एरा : २० षटकात पाच बाद १९१ (प्रदीप जगदाळे ९२, स्वप्नील खडसे ३०, सारंग सराफ ३४, सुदर्शन एखंडे ९, मोहम्मद इम्रान नाबाद ११, इतर १४, शेख सादिक २-१६, आसिफ खान १-२९, राजेश शिंदे १-४९) विजयी विरुद्ध नॉन स्ट्रायकर्स : १९ षटकात सर्वबाद १६३ (इरफान पठाण ४२, शेख सादिक १४, आसिफ खान १३, सिद्धांत पटवर्धन २४, निलेश जाधव ६, लहू लोहार १४, गिरीश खत्री २०, सुमित आगरे १८, प्रदीप जगदाळे ३-२१, मोहम्मद इम्रान २-१८, अतिक नाईकवाडे २-२७, गिरिजानंद १-५१, अजिंक्य पाथ्रीकर १-२७, ओंकार सुर्वे १-१८). सामनावीर : प्रदीप जगदाळे.
२) श्लोक वॉरियर्स : २० षटकात तीन बाद १५४ (मयूर अग्रवाल २५, सय्यद फरहान नाबाद ५६, ज्ञानेश्वर पाटील २०, प्रवीण क्षीरसागर ३७, राहुल रगडे नाबाद १०, रोहन शाह २-२५, मयंक विजयवर्गीय १-२०) पराभूत विरुद्ध रोहन रॉयल्स : १९.४ षटकात सात बाद १५६ (विशाल नरवाडे १५, डॉ संदीप सानप ३६, रोहन शाह ४०, रोहन राठोड १७, मयंक विजयवर्गीय नाबाद २७, इतर २०, आमेर बदाम २-२३, वहाब २-२६, ज्ञानेश्वर पाटील २-४५). सामनावीर : रोहन शाह.