
गणेश माळवे
देहरादून (उत्तराखंड) : ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र राज्याचे महिला व पुरुष टेबल टेनिस संघाने अंतिम फेरी गाठली आहे.
महिला गटात महाराष्ट्र संघाने दिल्ली, तामिळनाडू, उत्तराखंड राज्य संघाला पराभूत करून उपांत्य फेरी गाठली. उपांत्य फेरीत महाराष्ट्र संघाचा सामना हरियाणा संघाशी झाला. उपांत्य लढतीत महाराष्ट्र महिला संघाने हरियाणा महिला संघाचा ३-० असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला.
दिया चितळे (कर्णधार) हिने स्नेहा भोईंमिक हिचा ११-३, १२-१४, ११-८, १२-१० असा पराभव करत संघाला आघाडी मिळवून दिली. स्वस्तिका घोष हिने पृथ्वीकी चक्रवर्ती हिचा ११-६, ११-२, ११-९ असा पराभव करत संघाची आगेकूच कायम ठेवली. तनिषा कोटेचा हिने श्रीदतरी रॉय हिचा ११-६, ७-११, ११-७, ११-३ असा पराभव करुन महाराष्ट्र संघाला ३-० असा विजय मिळवून देत अंतिम फेरी गाठली.

पुरुष गटात महाराष्ट्र संघाने दिल्ली, पश्चिम बंगाल आणि उत्तराखंड अशा तुल्यबळ संघांवर विजय नोंदवत उपांत्य फेरी गाठली होती. उपांत्य लढतीत महाराष्ट्र संघाने तेलंगणा संघावर ३-० असा विजय साकारत अंतिम फेरीत प्रवेश केला.
जश मोदी याने फ्रेडेल रिफीक याच्यावर ११-६, ११-७, ११-९ असा विजय साकारत महाराष्ट्र संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. रेगन अल्बुकर्क याने मोहंमद अली याचा ११-९, ११-९, ११-६ असा सहज पराभव करुन संघाची आघाडी २-० अशी भक्कम केली. चिन्मय सोमय्या याने स्वरमेंदु सोम याचा १०-१२, ११-१, ११-९, ११-३ असा पराभव करुन महाराष्ट्र संघाचा अंतिम फेरीतील प्रवेश निश्चित केला.
महाराष्ट्र राज्य महिला टेबल टेनिस संघ प्रशिक्षक सुनील बाब्रास, संघ व्यवस्थापक गणेश माळवे, तर पुरुष संघ प्रशिक्षक महेंद्र चिपळूणकर, संघ व्यवस्थापक श्रीराम कोनकर यांचे खेळाडूंना मार्गदर्शन लाभत आहे. महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे पथक प्रमुख संजय शेटे, स्मिता शिरोळे, उपपथक प्रमुख सुनील पूर्णपात्रे यांनी महाराष्ट्र संघास भेट देऊन प्रोत्साहन दिले.
महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे, महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे सरचिटणीस नामदेव शिरगावकर, टेबल टेनिस राज्य अध्यक्ष प्रवीण लुंकड, राज्य सरचिटणीस यतिन टिपणीस, प्रकाश तुळपुळे यांनी खेळाडूंचे अभिनंदन करुन अंतिम सामन्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.