तलवारबाजी स्पर्धेत नागपूरच्या श्रुती जोशीने जिंकले कांस्य पदक 

  • By admin
  • February 10, 2025
  • 0
  • 30 Views
Spread the love

ड्रायव्हरच्या मुलीची चमकदार कामगिरी, राष्ट्रीय स्पर्धेत पटकावले पहिलेच पदक

हल्दवानी : ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या श्रुती जोशी हिने कांस्य पदक पटकावून तलवारबाजीत पदकाचे खाते उघडले. श्रुतीचे वडिल धर्मेद्र जोशी हे नागपूरमध्ये खाजगी वाहनावर ड्रायव्हर असून तिचे हे राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील पहिलेच पदक आहे.

चौखांबा हॉलमध्ये सुरू असलेल्या तलवारबाजीतील सायबर प्रकारामध्ये नागपूरच्या श्रुती जोशीने नेत्रदीपक कामगिरी केली. साखळी सामन्यांमध्ये पहिल्या ३२ मध्ये अव्वल स्थान संपादन करून श्रुती पदकाची दावेदार बनली होती. सलामीच्या लढतीत हरियाणाच्या मंजूवर १५-२ गुणांनी श्रुतीने दणदणीत विजय मिळवला. जम्मू काश्मीरच्या श्रेयावर १५-१० गुणांनी मात करून तिने उपांत्यपूर्व फेरीत मजल मारली. सुपर ८ लढतीत छत्तीसगडच्या वेदिका खुशीवर तिने १५-१० गुणांनी मोठा विजय संपादन करून पदक निश्चित केले.

उपांत्य फेरीत तामिळनाडूची भवानी देवी विरूद्ध महाराष्ट्राची श्रुती जोशी ही लढत लक्षवेधी ठरली. ऑलिम्पिकपटू असलेल्या भवानी देवी विरूद्ध  श्रुतीने चुरशीची झुंज दिली. अटीतटीच्या सामन्यांमध्ये १०-१५ गुणांनी भवानी देवी विजयी झाल्याने श्रुतीला कांस्यपदक प्राप्त झाले. भारतीय फेन्सिंग महासंघाचे सहसचिव व महाराष्ट्राचे उपपथक प्रमुख डॉ उदय डोंगरे व नैनीतालच्या जिल्हा क्रीडा अधिकारी नर्मला पंत यांच्या हस्ते श्रुतीला पदक बहाल करण्यात आले.

गोवा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत २१ वर्षीय श्रुती सहभागी झाली होती. त्यानंतर खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याने तिची केरळमधील साईच्या प्रशिक्षक केंद्रात निवड झाली. अंकित गजबीय व सागर लागू तिचे प्रशिक्षक असून केरळमधील साईच्या केंद्रात कसून सराव करीत तिने हल्दवानीची स्पर्धेत यश मिळवले आहे. उत्तराखंडमधील स्पर्धेसाठी प्रशिक्षक आनंद वाघमारे, अजय त्रिभुवन, स्वामी पेरीया, शिल्पा नेने, सौरभ तोमर,राजू शिंदे , प्रकाश कटुळे व तलवारबाजी संघाचे व्यवस्थापक शेषनारायण लोंढे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

ऑलिम्पिक खेळाडू भवानी देवी विरूद्ध लढताना चिवट झुंज मी दिली असे सांगून श्रुती जोशी म्हणाली की, ‘राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याचे माझे ध्येय आहे. आता आशियाई स्पर्धेसाठी मी तयारी करणार आहे. देशासाठी खेळून आई-वडिलांचे नाव मला उज्वल्ल करायचे आहे.’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *