
क्रीडा सहसंचालक सुधीर मोरे यांची माहिती
छत्रपती संभाजीनगर : दहावी आणि बारावी इयत्तेत शिकत असलेल्या खेळाडू विद्यार्थ्यांना ग्रेस गुण मिळण्यात कोणताही मानवी चूक राहू नये यासाठी यंदा ग्रेस गुणांचे प्रस्ताव ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येणार आहेत. शासनाच्या आपले सरकार पोर्टलद्वारे ऑनलाईन प्रणालाद्वारेच महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्याकडे ग्रेस गुणांचे प्रस्ताव सादर करण्याची सुविधा निर्माण करुन देण्यात आली आहे, अशी माहिती क्रीडा सहसंचालक सुधीर मोरे यांनी दिली आहे.
क्रीडा सहसंचालक सुधीर मोरे यांनी राज्यातील सर्व जिल्हा क्रीडा अधिकारी यांना १० फेब्रुवारी रोजी एक पत्र पाठवून ग्रेस गुण प्रस्ताव प्रक्रिया ऑफलाईन ऐवजी आता ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
दहावी आणि बारावीच्या खेळाडू विद्यार्थ्यांचे ग्रेस गुणांचे प्रस्ताव यापूर्वी ऑफलाईन पद्धतीने मागवले जात होते. त्यानंतर माहितीचे संकलन करुन जिल्हा क्रीडा कार्यालयाद्वारे हे ग्रेस गुणांचे प्रस्ताव माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळास पाठवले जात असे. २०२३-२४ पर्यंतची ग्रेस गुण प्रक्रिया काही मानवी उणीवांमुळे हे काम अचुक व दोषरहीत होणे क्लिष्ट होत होते. त्याचा फटका खेळाडू विद्यार्थ्यांना त्यांच्या गुण न मिळण्याने बसत होता. या प्रश्नावर तोडगा आणि सदर सवलत गुण प्रक्रिया निर्दोष करण्यासाठी या वर्षीपासून म्हणजे २०२४-२५ पासून ग्रेस गुणांसाठी केली जाणारी प्रक्रिया शासनाच्या आपले सरकार पोर्टलद्वारे ऑनलाईन करण्यात आली आहे. तसेच सदर पोर्टलद्वारे सर्व अर्ज ऑनलाईन प्रणालीद्वारेच महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्याकडे सादर करण्याची सुविधा निर्माण करुन देण्यात आली आहे, असे क्रीडा सहसंचालक सुधीर मोरे यांनी १० फेब्रुवारी रोजीच्या पत्रात नमूद केले आहे.
खेळाडू विद्यार्थी तसेच जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय यांनी आपले सरकार अॅपद्वारे या वर्षीपासून सवलत गुणांचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरावयाचा आहे. जिल्हा, विभाग, राज्य व राष्ट्रीय स्पर्धेतील सहभाग अथवा प्राविण्यासाठी सवलत गुणांसाठी केवळ ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक आहे. सदर अर्जाची प्रत शिक्षण मंडळासही या प्रणालीद्वारेच आपोआप पाठवली जाईल. त्यासंदर्भात कोणताही खेळाडू जिल्हा क्रीडा कार्यालयास अथवा शिक्षण मंडळास ऑफलाईन पद्धतीने अर्ज करणार नाही व अशा प्रकारचा ऑफलाईन अर्ज कोणत्याही जिल्हा क्रीडा कार्लालयाकडून स्वीकारला जाऊ नये. जर अशी बाब मुख्यालयाच्या निदर्शनास आली तर त्यासंदर्भात होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीस संबंधित जिल्हा क्रीडा अधिकारी जबाबदार राहतील, असे क्रीडा सहसंचालक सुधीर मोरे यांनी स्पष्ट केले आहे.
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयांनी आता पूर्वीप्रमाणे तीन लॉग-इन वापरण्याऐवजी केवळ दोनच लॉग-इन वापरावयाचे आहेत. तिसरे लॉग-इन हे आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळास हाताळण्यास देण्यात आले आहे. तथापि, उपरोक्त विषयासंदर्भात दिलेल्या सुचनांची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्याची दक्षता घ्यावी. त्यानुसार खेळाडू विद्यार्थी व जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयातील खेळाडू विद्यार्थ्यांना सदर प्रणालीद्वारे अर्ज करण्याबाबतच अवगत करण्यात यावे अशी सूचना क्रीडा सहसंचालक सुधीर मोरे यांनी केली आहे.