
देहरादून : राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील माऊंटन बायकिंग मधील एमटीबी सायकलिंग प्रकारात महाराष्ट्राची आंतरराष्ट्रीय सायकलपटू प्रणिता सोमण हिने सुवर्णपदकाची कमाई केली. प्रथमच समाविष्ट झालेल्या या खेळातही महाराष्ट्राने पदकांची कमाई केली आहे.
उत्तराखंडातील सातताल पर्वत रांगात सुरू असलेल्या एमटीबी सायकलिंगमधील क्रॉस कंट्री टाईम ट्रायल प्रकारात प्रणिता सोमण हिने चमकदार कामगिरीचे प्रदर्शन घडवले. प्रणिताने ४६ मिनिटे २६.८२३ सेकंदात चुरशीच्या शर्यतीत बाजी मारत अटीतटीच्या स्पर्धेत महाराष्ट्राला सुवर्णपदक जिंकून दिले. आहिल्यानगरमधील संगमनेरमध्ये प्रशिक्षक नितीन ठक्कर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रणिताचा नियमित सराव सुरू असतो. ऑस्ट्रेलियातही सरावासाठी प्रणिता गेली होती.
निसर्गरम्य उत्तराखंडच्या सातताल डोंगरदर्यातील खडकाळ मार्गावरील क्रॉस कंट्री टाईम ट्रायल शर्यतीत प्रणिताने सुरूवातीपााून मुसंडी मारली होती. अखेरच्या टप्प्यात तिने कर्नाटकच्या सायकलपटूला मागे टाकून बाजी मारली. कर्नाटकची आंतरराष्ट्रीय सायकलपटू स्टार नरझरी हिने ४६ मिनिटे ४४.४११ सेकंद वेळ देत रौप्यपदक, तर उत्तराखंडची सुनिता श्रेष्ठ ४८ मिनिटे ३८.९७५ सेकंदासह कांस्यपदकावर नाव कोरले.
पदार्पणातच सुवर्णपदक संपादन केल्याबद्दल प्रणिता म्हणाली की, ‘महाराष्ट्रासाठी हे पदक जिंकताना खूप आनंद होत आहे. हे पदक माझ्यासाठी जिंकण्याची प्रेरणा देणारे आहे. प्रणिताच्या यशामध्ये महाराष्ट्राच्या संघाबरोबर असलेले प्रशिक्षक बिरू भोजने आणि यशोधरा शेरकर यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे.