जिम्नॉस्टिक्स स्पर्धेत महाराष्ट्र संघाचा सुवर्ण पदकांचा षटकार

  • By admin
  • February 11, 2025
  • 0
  • 95 Views
Spread the love

ऍक्रोबॅटीक प्रकारात सुवर्ण चौकारांसह एका रौप्य, रिदमिक्स प्रकारात सांघिक सुवर्ण, ट्रॅम्पोलिन प्रकारात एक सुवर्ण, एक रौप्य

देहरादून : जिम्नॉस्टिक्स स्पर्धेत सुवर्णपदकांचा षटकार झळकावत महाराष्ट्राने ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील १५ वा दिवस गाजविला.अक्रोबॅटिक प्रकारात तालबद्ध, सुरबद्ध आणि अचंबित करणार्‍या रचना सादर करुन चार सुवर्णपदकांसह एक रौप्य अशी पाच पदकांची लयलूट करीत केली. पाठोपाठ रिदमिक्स प्रकारात सांघिक सुवर्ण व ट्रॅम्पोलिन वैयक्तिक प्रकारात एक सुवर्ण आणि एका रौप्य पदकाची कमाई केली. जिम्नॉस्टिक्समधील यशाने ३८ सुवर्ण पदकांसह पदकतक्यात महाराष्ट्र दुसर्‍या स्थानावर आहे.

भागीरथी क्रीडा संकुलात सुरू असलेल्या स्पर्धेत महाराष्ट्राचा बोलबाला दिसून आला. अक्रोबॅटिकमध्ये महाराष्ट्राने महिला दुहेरी, मिश्र दुहेरी, पुरुष सांघिक गट व महिला तिहेरी या चार गटात सुवर्णपदक जिंकले. मात्र, या प्रकाराच्या पुरुष दुहेरीत महाराष्ट्राच्या जोडीला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. रिदमिक्स प्रकारात महाराष्ट्राने सांघिक गटात नेत्रदीपक आणि अचंबित करणार्‍या रचना सादर करुन सुवर्णपदकावर मोहोर उमटवली. संयुक्ता काळे, किमया कार्ले, परिणा मदन पोत्रा व शुभश्री मोरे या महिला चौकडीने एकूण २३९.०५ गुणांची कमाई करीत महाराष्ट्राला हे सोनेरी यश मिळवून दिले.

ट्रॅम्पोलिन प्रकारात महाराष्ट्राच्या खेळाडूंनी वैयक्तिक प्रकारात एक सुवर्ण आणि एका रौप्य पदकाची कमाई केली. पुरुषांच्या वैयक्तिक गटात छत्रपती संभाजीनगरच्या आयुष मुळे याने सर्वाधिक ४८.७४ गुणांची कमाई करीत महाराष्ट्राला सुवर्णपदक जिंकून दिले. गतवर्षी या स्पर्धेत कांस्यपदकावर समाधान मानावे लागलेल्या आयुष याने यावेळी सुवर्णपदकाला गवसणी घातली. सर्व पदक विजेत्यांचे पथक प्रमुख संजय शेटे, उपपथक प्रमुख स्मिता शिरोळे यांनी क्रीडा संकुलात उपस्थित राहून अभिनंदन केले. जिम्नॉस्टिक्समधील या यशाने अव्वल स्थानाकडे महाराष्ट्राची वाटचाल सुरू झाली असल्याचे पथक प्रमुख संजय शेटे यांनी सांगितले.

प्रशिक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंनी हे यश मिळविले. ही तर फक्त माझी सुरुवात आहे. या स्पर्धेत देशासाठी पदक जिंकणे हेच माझे मुख्य लक्ष होय, असे आयुष मुळे याने सांगितले. 

महिलांच्या वैयक्तीत गटात डोंबिवलीच्या चैत्राली सोनवणे हिने 39.28 गुणांसह रौप्यपदक जिंकले. दहावीत शिकणारी चैत्राली देखील संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. या प्रकारात सुवर्णपदकाची प्रबळ दावेदार असलेली रिया पाखरे आपली कला सादर करताना खाली पडली अन् तिचे सुवर्ण पदकाचे स्वप्न एका क्षणात भंगले. हातचे पदक गेल्याने तिला मैदानावरच अश्रू आणि हुंदके अनावर झाले होते.

अक्रोबॅटिकमध्ये महिला दुहेरीत ऋतुजा जगदाळे व निक्षिता खिल्लारे या महाराष्ट्राच्या जोडीने जबरदस्त बॅलन्स आणि अचंबित करणार्‍या रचना सादर करून ५१.२५० गुणांची कमाई करीत सुवर्णपदक खेचून आणले. पश्चिम बंगालला ४४.७०० गुणांसह रौप्य व केरळने ४३.५०० गुणांसह कांस्यपदक जिंकले. ऋतुजा आणि निक्षिता दोघीही मुंबईच्या असून, राहुल ससाणे व प्रवीण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईतील श्री नारायणराव आचार्य विद्या निकेतन शाळा, चेंबूर येथे सराव करतात. ऋतुजा हिचे राष्ट्रीय स्पर्धेतील हे दुसरे सुवर्णपदक असून, निक्षिताचे हे पहिलेच पदक आहे.

मिश्र दुहेरीत शुभम सरकटे व रिद्धी जैस्वाल या छत्रपती संभाजीनगरच्या जोडीने सर्वाधिक ५२.२५० गुणांची कमाई करीत सुवर्णपदक जिंकले. केरळने ४७.७२० गुणांसह रौप्य, तर कर्नाटकने ४६.८३९ गुणांसह कांस्यपदक जिंकले. शुभम व रिद्धी या महाराष्ट्राच्या जोडीचे राष्ट्रीय स्पर्धेतील हे पहिले सुवर्णपदक आहे. दोघेही प्रशिक्षक प्रवीण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती संभाजीनगर येथील केआरएस स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये सराव करतात. 

पुरुष सांघिक गटात प्रशांत गोरे, नमन महावर, रितेश बोराडे, यज्ञेश भोस्तेकर या मुंबईच्या चौकडीने ६४.६५० गुणांची कमाई करीत महाराष्ट्राला तिसरे सुवर्णपदक जिंकून दिले. केरळने ६१.२१० गुणांसह रौप्य, तर कर्नाटकने ५३.७४० गुणांसह कांस्य पदक जिंकले. प्रशिक्षक राहुल ससाणे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राच्या पुरुष संघाने हे सोनेरी यश संपादन केले. 

महिला सांघिकमध्ये अक्षता ढोकळे, अर्ना पाटील व सोनाली बोराटे या त्रिमूर्तींनी ६१.७३० गुणांची कमाई करीत महाराष्ट्राला अक्रोबॅटिकमधील चौथे सुवर्ण पदक जिंकून दिले. पश्चिम बंगालने ५१.५४० गुणांसह रौप्य, तर कर्नाटकने ४२.७५० गुणांसह कांस्यपदक जिंकले. राहुल ससाणे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राच्या महिला संघाने सोनेरी यश मिळाले, हे विशेष. या प्रकारात फक्त महाराष्ट्राच्या पुरुष दुहेरी संघाला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. गणेश पवार व आदित्य काळकुंद्रे या मुंबईच्या जोडीने ६१.०२० गुणांसह हे रूपेरी यश मिळविले. या प्रकारात कर्नाटक संघाने ६२.०५० गुणांसह सुवर्ण, तर हरियाणाने ५९.८४० गुणांसह कांस्यपदक जिंकले.

रिदमिक्स प्रकारात महाराष्ट्राने सांघिक गटात नेत्रदीपक आणि अचंबित करणार्‍या रचना सादर करुन सुवर्णपदकावर मोहोर उमटवली. संयुक्ता काळे, किमया कार्ले, परिणा मदन पोत्रा व शुभश्री मोरे या महिला चौकडीने एकूण २३९.०५ गुणांची कमाई करीत महाराष्ट्राला हे सोनेरी यश मिळवून दिले. जम्मू काश्मीर संघाला २३१.६५ गुणांसह रौप्य पदकावर समाधान मानावे लागले, तर १९२.६० गुणांसह हरियाणाने कांस्यपदक जिंकले. प्रशिक्षक मानसी गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राने हे अव्वल यश संपादन केले. या चारही मुली ठाण्याच्या असून त्या ठाण्यात द फिनिक्स जिम्नॅस्टिक्स अकादमी येथे सराव करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *