टेनिस स्पर्धेत महाराष्ट्राला दोन रौप्यपदके

  • By admin
  • February 11, 2025
  • 0
  • 26 Views
Spread the love

एकेरीत वैष्णवी आडकर, तर दुहेरी पूजा-आकांक्षा जोडीचे रुपेरी यश

देहरादून : ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी टेनिसमधील महिलांच्या वैयक्तिक विभागात दोन रौप्यपदकांची कमाई केली. पुण्याची खेळाडू वैष्णवी आडकर हिला एकेरीत अंतिम सामन्यात गुजरातच्या वैदेही चौधरी हिच्याकडून पराभूत व्हावे लागले, तर दुहेरी मध्ये पूजा इंगळे व आकांक्षा निठुरे यांना वैदेही व तिची सहकारी झील देसाई यांच्याकडून हार स्वीकारावी लागली.

एकेरीतील सरळ लढतीत वैदेही हिने वैष्णवीचे आव्हान ६-४, ६-४ असे सहज परतविले. या दोन्ही सेटमध्ये वैदेही हिने फोरहँड परतीच्या फटक्यांचा सुरेख खेळ केला. तसेच तिने बेसलाईनवरून व्हॉलीजचा कल्पकतेने उपयोग केला. वैष्णवी हिने दोन्ही सेट्समध्ये सर्व्हिस राखण्याचा कसोशीने प्रयत्न केला. मात्र, तिच्याकडून झालेल्या नकळत चुकांचा वैदेही हिला फायदा झाला.

सामना संपल्यानंतर वैष्णवी म्हणाली, ‘वैदेही विरुद्ध आज माझा अपेक्षेइतका अव्वल दर्जाचा खेळ होऊ शकला नाही. तसेच मला महत्त्वाच्या क्षणी सर्व्हिसवर नियंत्रण ठेवता आले नाही. अर्थात हे रौप्यपदकही माझ्यासाठी प्रेरणादायक आहे. अजून भरपूर मला संधी उपलब्ध आहेत. त्या दृष्टीनेच येथील कामगिरी माझ्यासाठी शिकवण्याची शिदोरीच आहे.‌’

दुहेरीत पूजा-आकांक्षा पराभूत
महाराष्ट्राच्या पूजा इंगळे व आकांक्षा निठुरे यांना अंतिम सामन्यात वैदेही चौधरी व झील देसाई या अवल दर्जाच्या खेळाडूंविरूद्ध पराभव पत्करावा लागला. त्यामुळे त्यांना रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.

वैदेही व झील यांनी हा सामना ६-३, ६-२ असा जिंकला. दोन्ही सेटमध्ये गुजरातच्या या जोडीने क्रॉस कोर्ट फटक्यांचा बहारदार खेळ केला. तसेच त्यांनी सर्व्हिस व प्लेसिंग यावर चांगले नियंत्रण ठेवले होते. त्या तुलनेमध्ये महाराष्ट्राच्या जोडीला दोन्ही सेट्स मध्ये स्वतःच्या सर्व्हिस व परतीच्या फटक्यांवर नियंत्रण ठेवता आले नाही. त्याचा फायदा गुजरातच्या जोडीला झाला.

हा सामना झाल्यावर आकांक्षा व पूजा यांनी सांगितले की, ‘अंतिम फेरीत आम्हाला जरी पराभव पत्करावा लागला तरी देखील या कामगिरी बाबत आम्ही समाधानी आहोत.‌ येथील रुपेरी कामगिरी आम्हाला भावी करिअरसाठी उपयुक्त ठरणार आहे. अजून भरपूर स्पर्धांमध्ये आम्हाला भाग घ्यावयाचा आहे. येथील अनुभव त्या दृष्टीने महत्त्वाचा आहे.’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *