ऑस्ट्रेलियाच्या चॅम्पियन्स ट्रॉफी संघात पाच बदल

  • By admin
  • February 12, 2025
  • 0
  • 17 Views
Spread the love

दुखापतग्रस्त कमिन्सच्या जागी स्मिथ करणार संघाचे नेतृत्व

मेलबर्न : चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियाने आपला अंतिम संघ जाहीर केला. ऑस्ट्रेलियन संघ सध्या दुखापतींनी त्रस्त आहे. संघातील अनेक मोठे खेळाडू जखमी आहेत आणि अशा परिस्थितीत मुख्य निवडकर्ता जॉर्ज बेली यांना पाच मोठे बदल करावे लागले. पॅट कमिन्सच्या जागी आता स्टीव्ह स्मिथ संघाचे नेतृत्व करणार आहे. 

ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला जेव्हा संघाचे तीन प्रमुख वेगवान गोलंदाज, कर्णधार पॅट कमिन्स, जोश हेझलवूड आणि मिशेल स्टार्क हे वेगवेगळ्या कारणांमुळे स्पर्धेतून बाहेर पडले. कमिन्स आणि हेझलवूड जखमी आहेत, तर स्टार्कने वैयक्तिक कारणांमुळे स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, मार्कस स्टोइनिसने एकदिवसीय सामन्यांमधून निवृत्ती घेतली आहे आणि मिशेल मार्श जखमी आहे. आता कमिन्सच्या जागी स्टीव्ह स्मिथ चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत कर्णधारपद भूषवताना दिसेल.

ऑस्ट्रेलियन संघातून कमिन्स, स्टार्क, हेझलवूड, स्टोइनिस आणि मार्श या पाच खेळाडूंना वगळण्यात आले आहे आणि त्यांच्या जागी शॉन अ‍ॅबॉट, बेन द्वारशुइस, जेक फ्रेचर मॅकगर्क, स्पेन्सर जॉन्सन आणि तनवीर संघा यांना संधी देण्यात आली आहे. मुख्य निवडकर्ता बेली म्हणाले की, ‘काही अकाली दुखापती आणि मार्कस स्टोइनिसच्या निवृत्तीनंतर गेल्या एका महिन्यात संघात बरेच बदल झाले आहेत. सकारात्मक पैलू असा आहे की गेल्या १२ महिन्यांत आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक पातळीवर यश मिळवलेल्या खेळाडूंना आम्ही बोलावू शकलो आहोत. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या या टप्प्यात जिंकण्याच्या आमच्या प्रयत्नांना काही अनुभवी खेळाडूंचा मजबूत पाया मजबूत करेल.’

जॉर्ज बेली म्हणाले की, ‘प्रतिस्पर्धी संघ आणि परिस्थितीनुसार स्पर्धेत प्लेइंग ११ ला आकार देण्यासाठी आमच्याकडे अनेक पर्याय आहेत. सध्याच्या ऑस्ट्रेलियन उन्हाळ्यात भारत आणि श्रीलंकेविरुद्धच्या सातही कसोटी सामन्यांमध्ये खेळणारा स्टार्क हा ‘बिग थ्री’ वेगवान गोलंदाजी हल्ल्यातील एकमेव सदस्य होता. बेली म्हणाले की ते स्टार्कच्या निर्णयाचा आदर करतात आणि त्यांच्या जाण्यामागील कारणे गुप्त ठेवण्यात आली आहेत.

बेली म्हणाले की, ‘स्टार्क आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी वचनबद्ध आहे. त्याची माघार निश्चितच चॅम्पियन्स ट्रॉफी मोहिमेसाठी धक्का आहे. पण त्यामुळे दुसऱ्या कोणाला तरी स्पर्धेत प्रभाव पाडण्याची संधी मिळेल. बुधवारपासून कोलंबो येथे सुरू होणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतही स्टार्क खेळू शकणार नाही. ऑस्ट्रेलियाची वेगवान गोलंदाजी आता स्पेन्सर जॉन्सन, नॅथन एलिस आणि बेन द्वारशुइस सारखे गोलंदाज हाताळतील.’
आरोन हार्डी हा सीमिंग अष्टपैलू खेळाडू म्हणून संघात आहे, तर उदयोन्मुख लेग-स्पिनर तन्वीर संघाला अॅडम झंपाच्या बॅकअप म्हणून संघात स्थान देण्यात आले आहे. आठ देशांचा समावेश असलेला चॅम्पियन्स ट्रॉफी १९ फेब्रुवारी ते ९ मार्च दरम्यान पाकिस्तान आणि संयुक्त अरब अमिरातीमध्ये खेळवला जाईल. ऑस्ट्रेलियाला इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तानसह गट ब मध्ये स्थान देण्यात आले आहे.

ऑस्ट्रेलिया दोनदा चॅम्पियन्स ट्रॉफी विजेता
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेची ही नववी आवृत्ती आहे. ऑस्ट्रेलियन संघ दोनदा विजेता राहिला आहे. ऑस्ट्रेलियाने २००६ आणि २००९ मध्ये ही स्पर्धा जिंकली होती. २००६ मध्ये त्यांनी अंतिम सामन्यात वेस्ट इंडिजचा पराभव केला आणि २००९ मध्ये अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा पराभव केला. या संघाला दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि अफगाणिस्तानसह गट ब मध्ये स्थान देण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियाचा पहिला सामना २२ फेब्रुवारी रोजी लाहोरमध्ये इंग्लंडविरुद्ध आहे. संघ २५ फेब्रुवारी रोजी दक्षिण आफ्रिकेचा सामना करेल. २८ फेब्रुवारी रोजी ऑस्ट्रेलियन संघ लाहोरमध्ये अफगाणिस्तानशी सामना करेल.

ऑस्ट्रेलिया संघ 
स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), शॉन अ‍ॅबॉट, अ‍ॅलेक्स केरी, बेन द्वारशुइस, नॅथन एलिस, जेक फ्रेझर-मॅकगर्क, आरोन हार्डी, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिश, स्पेन्सर जॉन्सन, मार्नस लाबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, तन्वीर संघा, मॅथ्यू शॉर्ट, अ‍ॅडम झांपा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *