
मुंबई : ओरिएंटल इन्शुरन्स संघाने १४व्या इन्शुरन्स ओरिएंटल एलिट शील्ड टी २० क्रिकेट स्पर्धेत एअर इंडियावर ४ विकेटने विजय मिळवत शानदार कामगिरी नोंदवली.
क्रॉस मैदान येथील नॅशनल क्रिकेट क्लबच्या मैदानावर झालेल्या या लढतीत एअर इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. विशाल गिरपने ४७ धावांची संयमी खेळी करत संघाचा डाव सावरला, तर लक्ष्य झंवरने २४ धावा करून त्याला साथ दिली. मात्र, ओरिएंटल इन्शुरन्सच्या प्रभावी गोलंदाजीसमोर इतर फलंदाज टिकाव धरू शकले नाहीत आणि संघ १३७ धावांवर गारद झाला.
ओरिएंटल इन्शुरन्स संघाच्या आर्यवीर राकेशने ४/१५ अशी भेदक मारा करत एअर इंडियाच्या फलंदाजांची दाणादाण उडवली. मीत पटेलनेही २/२७ च्या प्रभावी गोलंदाजीतून महत्त्वाच्या विकेट घेतल्या, तर संतोष सुके याने किफायतशीर मारा करत धावगतीला ब्रेक लावला.
नाट्यमय घडामोडी
लक्ष्याचा पाठलाग करताना ओरिएंटल इन्शुरन्स संघाच्या सलामीवीर जोडीने धडाकेबाज सुरुवात केली. अमन वर्मा याने ६६ धावांची झुंजार खेळी साकारत संघाच्या विजयाचा पाया रचला. सुमेध निकमने त्याला सुरुवातीला उत्तम साथ दिली आणि दोघांनी मिळून ७७ धावांची भागीदारी केली.
मात्र, ही जोडी बाद झाल्यानंतर ओरिएंटल इन्शुरन्सच्या संघाने काही वेळ संघर्ष केला. सलग तीन विकेट पडल्याने एअर इंडियाने सामन्यात पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, अर्थव घोसाळकर आणि तरुण बसे यांनी संयम राखत सामना संघाच्या बाजूने फिरवला आणि ओरिएंटल इन्शुरन्स संघाने ६ विकेट राखून विजय साकारला.
उद्घाटन सोहळा
या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीच्या उपमहाव्यवस्थापक व्ही रीमादेवी, एमसीएचे पदाधिकारी संदीप विचारे आणि मंगेश साटम उपस्थित होते. प्रतिष्ठित मान्यवर, आयोजक आणि क्रिकेटप्रेमींच्या साक्षीने या प्रतिष्ठित स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला.