
आत्माराम मोरे स्मृती क्रिकेट स्पर्धा
मुंबई : अष्टपैलू खेळ, तगडी भागीदारी आणि कप्तानाची आक्रमक खेळीच्या जोरावर कस्तुरबा हॉस्पिटल संघाने बलाढ्य सेव्हन हिल्स हॉस्पिटलवर ४ विकेट्सने विजय मिळवत आत्माराम मोरे स्मृती आंतर रुग्णालय टी २० क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. महेश सणगर आणि कल्पेश भोसले यांच्या महत्वपूर्ण भागीदारीने विजयाची पायाभरणी केली, तर कप्तान अंकुश जाधवने शेवटच्या षटकांत सामन्याचा निकाल आपल्या संघाच्या बाजूने लावला.
आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीच्या संयुक्त विद्यमाने आणि लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या सहकार्याने आयोजित या प्रतिष्ठित स्पर्धेत कस्तुरबा हॉस्पिटल संघाने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. त्यांच्या गोलंदाजांनी हा निर्णय योग्य ठरवत सुरुवातीलाच सेव्हन हिल्स हॉस्पिटल संघाला अडचणीत टाकले.
शेख-गुरवची दमदार झुंज
तिसऱ्या षटकात मध्यमगती गोलंदाज रोहन ख्रिश्चनने ९ धावांत ३ गडी बाद करत सेव्हन हिल्सला ३ बाद ९ धावांवरच रोखले. मात्र, डॉ इब्राहीम शेख (२५ धावा) आणि सुशांत गुरव (२१ धावा) यांनी संघाला सावरत १०६ धावांपर्यंत मजल मारून दिली. कस्तुरबासाठी अंकुश जाधव, महेश सणगर आणि मंगेश आगे यांनी प्रत्येकी २ बळी घेत प्रभावी कामगिरी बजावली.
महेश-कल्पेशची ‘मॅचविनिंग’ भागीदारी
१०७ धावांचे लक्ष्य गाठताना कस्तुरबा हॉस्पिटलला पहिल्याच चेंडूवर मोठा धक्का बसला, जेव्हा डॉ हर्षद जाधवच्या अचूक गोलंदाजीवर सलामीवीर रोहन जाधव शून्यावर बाद झाला. पण, महेश सणगर (३० धावा) आणि कल्पेश भोसले (३२ धावा) यांनी दुसऱ्या विकेटसाठी ७० धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी करत डाव सावरला.
सेव्हन हिल्सच्या डावखुऱ्या फिरकीपटू स्वप्नील शिंदेने (३ बळी) आणि डॉ मनोज यादवने (१ बळी) सामना पुन्हा रंगतदार केला. त्यांनी १४ व्या षटकात कस्तुरबाची अवस्था ६ बाद ९३ अशी करत सामना आपल्या बाजूने झुकवण्याचा प्रयत्न केला.
अंकुश जाधवची स्फोटक खेळी
सामना अटीतटीचा होत असताना कप्तान अंकुश जाधवने फक्त ६ चेंडूत १२ धावा फटकावत संघाला १५.३ षटकांतच विजय मिळवून दिला. त्याच्या आक्रमक फटकेबाजीमुळे कस्तुरबा हॉस्पिटलने ६ बाद १०७ धावा करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला.
महेश सणगरला सामनावीर पुरस्काराने, तर स्वप्नील शिंदेला उत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरवण्यात आले. विजेत्या खेळाडूंचा सन्मान क्रिकेटपटू डॉ हर्षद जाधव, चंद्रकांत करंगुटकर, प्रदीप क्षीरसागर आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.