
रमेश देसाई स्मृती राष्ट्रीय टेनिस स्पर्धा
पुणे : महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना (एमएसएलटीए) यांच्या वतीने आयोजित १९व्या रमेश देसाई मेमोरियल राष्ट्रीय १२ वर्षांखालील टेनिस स्पर्धेत मुलींच्या गटात चाहत ठाकूर, त्रिशा भोसले, मीरा सिंग यांनी मानांकित खेळाडूंवर विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

जीए रानडे टेनिस कोर्ट या ठिकाणी सुरू असलेल्या या स्पर्धेत उप-उपांत्यपूर्व फेरीत मुलींच्या गटात बिगर मानांकित महाराष्ट्राच्या चाहत ठाकूर हिने तिसऱ्या मानांकित गुजरातच्या फलक मेहताचा ६-१, ६-३ असा तर, महाराष्ट्राच्या बाराव्या मानांकित त्रिशा भोसलेने पाचव्या मानांकित सारा फेंगसे हिचा ६-१, ६-३ असा पराभव करून सनसनाटी निकाल नोंदवला. उत्तराखंडच्या मीरा सिंग हिने सोळाव्या मानांकित पंजाबच्या असीस ब्रार हिचा ६-३, ४-६, ६-१ असा तीन सेटमध्ये पराभव करून आपली अनपेक्षित निकालाची मालिका कायम ठेवली.
मुलांच्या गटात सातव्या मानांकित महाराष्ट्राच्या यशवंतराजे पवार याने तेलंगणाच्या अकराव्या मानांकित मोहम्मद अहीलचा टायब्रेकमध्ये ६-३, ७-६ (३), ६-२ असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली. चौथ्या मानांकित महाराष्ट्राच्या लक्ष्य त्रिपाठी याने अनुप ऋषभला ६-२, ६-१ असे पराभूत केले.