
कांस्य पदकासाठी खेळावे लागणार
हरिद्वार : महाराष्ट्राच्या पुरुष व महिला या दोन्ही हॉकी संघांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांना शेवटपर्यंत जिद्दीने लढत दिली. मात्र, या दोन्ही संघांना येथे सुरू असलेल्या ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत उपांत्य फेरीत पराभवास सामोरे जावे लागले. पुरुष गटात कर्नाटकने महाराष्ट्राला सडनडेथ द्वारा ७-६ (पूर्णवेळ २-२) असे पराभूत केले, तर महिलांमध्ये मध्य प्रदेश संघाने महाराष्ट्राला पेनल्टी शूटआउटद्वारा ३-१ (पूर्णवेळ १-१) असे पराभूत केले. महाराष्ट्राला कांस्यपदक मिळवण्याची संधी असून, गुरुवारी त्यासाठी खेळावे लागणार आहे.
उपांत्य फेरीचे दोन्ही सामने अतिशय रंगतदार झाले. अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा समावेश असलेल्या कर्नाटक संघाला महाराष्ट्राच्या खेळाडूंनी चिवट लढत दिली. पूर्ण वेळेत महाराष्ट्राकडून आदित्य लाळगे व हरीश शिंदगी यांनी प्रत्येकी एक गोल केला. हे दोन्ही गोल त्यांनी प्रतिस्पर्धी संघाचे दोन बचावरक्षक व गोलरक्षकाला चकवीत नोंदविले. मात्र, कर्नाटकच्या खेळाडूंनी देखील दोन गोल करीत सामना बरोबरीत त्यामुळे पेनल्टी शूटआउटचा उपयोग करण्यात आला त्यावेळी कर्नाटकच्या खेळाडूंनी पाच संधींचा पुरेपूर लाभ घेत गोल नोंदविले. महाराष्ट्राला मात्र चारच गोल नोंदविता आले.
महिलांमधील महाराष्ट्र विरुद्ध मध्यप्रदेश हा सामना अतिशय रंगतदार झाला. महाराष्ट्रकडून पूर्ण वेळेत ऐश्वर्या दुबे हिने पेनल्टी कॉर्नरचा उपयोग करीत एकमेव गोल नोंदविला. मध्यप्रदेश संघानेही एक गोल केला त्यामुळे सामना १-१ असा बरोबरीत सुटला. साहजिकच पेनल्टी शूटआउट चा उपयोग करण्यात आला. त्यावेळी महाराष्ट्राला एकही गोल नोंदविता आला नाही याउलट मध्यप्रदेशच्या खेळाडूंनी दोन गोल करीत आपल्या संघास विजय मिळवून दिला.