
निवड चाचणीत ३८९ खेळाडूंचा सहभाग
धुळे : धुळे शहरातील जिल्हा क्रीडा संकुलात महाराष्ट्र राज्य सब ज्युनिअर अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेसाठी निवड चाचणी घेण्यात आली. अत्यंत रंगतदार झालेल्या या स्पर्धेत जिल्हाभरातून ३८९ खेळाडू सहभागी झाले होते. यातून निवड झालेले खेळाडू ७६ खेळाडू राज्यस्तरावर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
जिल्हा क्रीडा संकुलात धुळे जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले होते. ८ ते १६ वर्षांखालील वयोगटात धुळे जिल्ह्यातील ३८९ खेळाडू सहभागी झाले होते. १०० मीटर धावणे, २०० मीटर धावणे, ३०० मीटर धावणे, ६०० मीटर धावणे, ६० मीटर धावणे, लांब उडी, गोळा फेक, ४ बाय १०० रिले अशा वेगवेगळ्या क्रीडा प्रकारात खेळाडूंनी आपले कसब पणाला लावले. या स्पर्धेतून ७६ खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. हे खेळाडू पंढरपूर २२ व २३ फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
या स्पर्धेचे उद्घाटन माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, डॉ. सुशील महाजन, मित्तलसिंह ठाकुर, विजुनाना देवरे यांच्या हस्ते करण्यात आले. पारितोषिक वितरण अमोल पाटील, सचिन शेवतकर, असोसिएशनचे सचिव नरेंद्र पाटील, कोषाध्यक्ष हेमंत भदाणे यांच्या हस्ते करण्यात आले.
या स्पर्धेत पंच म्हणून गोमाजी थोरात, विश्वास पाटील, प्रमोद पाटील, सुकदेव महाले, प्रशांत पाटील, विलास वळवी, हेमंत पाटील, तन्मय थोरात, अभिषेक शिंदे, शैलेश पवारा आदीनी परिश्रम घेतले. राज्यस्तरावर ७६ मुले व मुली जाणार आहेत. त्यांना प्रशिक्षक प्रमोद पाटील व मॅनेजर विश्वास पाटील यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.