
मोरे स्मृती चषक आंतर रुग्णालय टी २० क्रिकेट स्पर्धा
मुंबई : आत्माराम मोरे स्मृती चषक आंतर रुग्णालय टी २० क्रिकेट स्पर्धेत ब्रीच कॅन्डी हॉस्पिटल संघाने केईएम हॉस्पिटलवर ८ विकेटने दणदणीत विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. अष्टपैलू शंतनू मोरेच्या नाबाद अर्धशतकासह कप्तान प्रदीप क्षीरसागर, रोहन महाडिक आणि मनोज कांबळे यांनी दमदार कामगिरी करत केईएमच्या विजयाच्या आशा धुळीस मिळवल्या.
नाणेफेक जिंकून फलंदाजीला उतरलेल्या केईएम हॉस्पिटल संघाचा डाव डगमगता ठरला. मध्यमगती गोलंदाज शंतनू मोरे (१७ धावांत ३ बळी) आणि फिरकीपटू प्रदीप क्षीरसागर (२४ धावांत १ बळी) यांनी सुरुवातीला कडवी झुंज दिली. मात्र, त्यानंतर गौरव बरोडिया (३० चेंडूत ३३ धावा), विनायक कोकणे (१८ चेंडूत २६ धावा), जयदीप मेहेर (१७ चेंडूत नाबाद २० धावा) आणि डॉ बालाजी बास्ते (१७ चेंडूत १४ धावा) यांनी डाव सावरत संघाला २० षटकांत ५ बाद १२२ धावांपर्यंत पोहोचवले.
शंतनू मोरेची फटकेबाजी
विजयासाठी १२३ धावांचे आव्हान घेतलेल्या ब्रीच कॅन्डी हॉस्पिटल संघाने आक्रमक सुरुवात केली. सलामीवीर शंतनू मोरे (४३ चेंडूत नाबाद ५४ धावा) याने संयमी आणि आक्रमक फलंदाजी करत संघाला विजयाच्या जवळ नेले. त्याला रोहन महाडिक (२९ चेंडूत ३३ धावा) आणि मनोज कांबळे (१७ चेंडूत नाबाद २१ धावा) यांची उत्तम साथ मिळाली. या तिघांच्या फटकेबाजीच्या जोरावर ब्रीच कॅन्डी हॉस्पिटलने १७.४ षटकांतच २ बाद १२३ धावा फटकावत एकतर्फी विजय मिळवला.
विजेत्यांचा गौरव
नाबाद अर्धशतक झळकावणाऱ्या शंतनू मोरे याला ‘सामनावीर’, तर गौरव बरोडियाला ‘उत्कृष्ट खेळाडू’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा सोहळा माहीम ज्युवेनाईलचे सेक्रेटरी सुनील पाटील, को-ऑप बँक युनियनचे कोषाध्यक्ष प्रमोद पार्टे, जनार्दन मोरे आणि स्पर्धा संयोजक लीलाधर चव्हाण यांच्या उपस्थितीत पार पडला.
clear
Show more