इस्लाम जिमखाना संघाचा मारवाडी स्पोर्ट्स क्लबवर दणदणीत विजय

  • By admin
  • February 14, 2025
  • 0
  • 22 Views
Spread the love

सालार जंग टी २० क्रिकेट स्पर्धा

मुंबई : इस्लाम जिमखाना संघाने आपल्या दमदार कामगिरीच्या जोरावर मारवाडी स्पोर्ट्स क्लबचा २० धावांनी पराभव करत ७५ व्या सालार जंग टी २० क्रिकेट स्पर्धेत विजयी आगेकूच केली. या सामन्यात साईराज पाटीलच्या नाबाद ८४ धावांची खेळी निर्णायक ठरली.

इस्लाम जिमखाना मैदानावर खेळल्या गेलेल्या या सामन्यात अंधुक प्रकाशामुळे प्रत्येकी १५ षटकांचा सामना खेळवण्यात आला. प्रथम फलंदाजी करताना इस्लाम जिमखाना संघाने १५ षटकांत ३ बाद १८५ धावांचा भक्कम डोंगर उभारला. साईराज पाटीलने ४६ चेंडूंत नाबाद ८४ धावांची खेळी करताना ११ चौकार आणि ३ षटकार ठोकत मैदानावर वर्चस्व गाजवले. त्याला विनायक भोईरने १५ चेंडूंत तडाखेबाज ३४ धावा करून उत्तम साथ दिली.

मारवाडी स्पोर्ट्स क्लबची झुंज
१८५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मारवाडी स्पोर्ट्स क्लबने संघर्षपूर्ण खेळ केला, मात्र त्यांची मजल १५ षटकांत ४ बाद १६५ धावांपर्यंतच गेली. विनय कुंवरने २१ चेंडूंत ५२ आणि सागर मिश्राने २७ चेंडूत ५० धावांची झुंजार खेळी साकारली. मात्र, इस्लाम जिमखान्याच्या गोलंदाजांनी अखेरच्या षटकांत प्रभावी मारा करत विजय निश्चित केला. जावेद खानने २ बळी घेतले, तर साईराज पाटीलनेही १ बळी घेत संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली.

मुस्लिम युनायटेड संघाचा विजय
दुसऱ्या सामन्यात मुस्लिम युनायटेड स्पोर्ट्स क्लबने पी जे हिंदू जिमखाना संघाचा ३१ धावांनी पराभव करत प्रभावी विजय मिळवला. मुस्लिम युनायटेड संघाने प्रथम फलंदाजी करत २० षटकांत ७ बाद १७६ धावा केल्या. ध्रुमिल मटकरने ४० चेंडूंत ७४ धावांची जबरदस्त खेळी करत संघाचा डाव भक्कम केला. यासीन सौदागरने १६ चेंडूंत ३१ धावा करून उत्तम योगदान दिले.

पी जे हिंदू जिमखाना संघाचा डाव २० षटकांत ८ बाद १४५ धावांपर्यंतच मजल मारू शकला. एकनाथ केरकरने ५१ आणि सिद्धांत अधटरावने ४१ धावांची खेळी करत संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, ऐश्वर्य सुर्वे (३/२२) आणि यासीन सौदागर (३/१४) यांनी धारदार मारा करत मुस्लिम युनायटेड संघाला विजय मिळवून दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *