
शनिवारी आणि रविवारी रमणबाग येथे रंगणार स्पर्धा
पुणे : खो-खो खेळाच्या प्रगतीमध्ये महत्त्वाचा टप्पा गाठत, शालेय स्तरावर पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मॅटवर डेक्कन एज्युकेशन सोसायटी आणि रमणबाग मित्र मंडळाच्या संयुक्त विद्यमाने या ऐतिहासिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा रमणबाग येथील मैदानावर १५ व १६ फेब्रुवारी रोजी रंगणार आहे.
महेश जोशी यांनी सांगितले की, ‘बदलत्या काळानुसार खेळाची गरज आणि स्वरूप लक्षात घेऊन डेक्कन एज्युकेशन सोसायटीने हे आयोजन केले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर वापरण्यात येणाऱ्या या तंत्रज्ञानाचा शालेय स्तरावर प्रथमच समावेश होणे, हे महाराष्ट्रातील खो-खो क्षेत्रासाठी मोठे पाऊल मानले जात आहे.’
या स्पर्धेमुळे नवोदित खेळाडूंना आधुनिक सुविधांचा लाभ मिळेल आणि भविष्यातील आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी त्यांची तयारी मजबूत होईल. आयोजकांनी या नव्या उपक्रमाबद्दल आनंद व्यक्त केला असून, शालेय खेळाडूंसाठी ही स्पर्धा पर्वणी ठरणार आहे.
स्पर्धेत मुलांच्या गटात न्यू इंग्लिश स्कूल (रमणबाग), न्यू इंग्लिश स्कूल (टिळकरोड), डी ई एस सेकंडरी स्कूल, एम एस गोळवलकर गुरुजी विद्यालय, एनईएमएस स्कूल, एच ए हायस्कूल यांनी तर मुलींच्या गटात डी ई एस सेकंडरी स्कूल, एम एस गोळवलकर गुरुजी विद्यालय, अहिल्यादेवी हायस्कूल फॉर गर्ल्स स्कूल, एनईएमएस स्कूल, एच ए हायस्कूल यांनी आपला सहभाग नोंदवला आहे.