सलग दुसर्‍यांदा महाराष्ट्राच्या पदकाचे द्विशतक

  • By admin
  • February 14, 2025
  • 0
  • 30 Views
Spread the love

३८वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा महाराष्ट्राच्या खेळाडूंनी गाजवली

हल्दवानी (उत्तराखंड) : महाराष्ट्राने सलग दुसर्‍यांदा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत दोनशे पदके जिंकण्याचा पराक्रम केला आहे. ३८व्या स्पर्धेतही द्विशतकी कामगिरी करणारे महाराष्ट्र देशातील एकमेव राज्य ठरले आहे. स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी मल्लखांबपटू यशाने महाराष्ट्राने २०१ पदके जिंकून स्पर्धा गाजवली.

उत्तराखंडातील ३८ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत ५४ सुवर्ण पदकांसह ७१ रौप्य आणि ७६ कांस्य पदकांची लयलूट करीत पदकतक्यात महाराष्ट्र संघाने दुसर्‍या स्थान संपादन केले आहे. गत गोवा स्पर्धेत महाराष्ट्राने ८० सुवर्ण, ६७ रौप्य व ७९ कांस्य अशी एकूण २२८ पदकांची लयलूट करीत ऐतिहासिक कामगिरी केली होती. यंदाही २०० पदकांचा पल्ला महाराष्ट्राने पूर्ण करण्याचा इतिहास घडविला आहे.

या स्पर्धेच्या १७व्या दिवशी रात्री ऊशिरापर्यंत मल्लखांब स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला नव्हता. स्पर्धा समितीने शुक्रवारी सकाळी पदकाचा अंतिम तक्ता जाहीर केला. त्यामध्ये मल्लखांब मधील ३ कांस्य पदकांमुळे महाराष्ट्राने पदकाचे द्विशतक पूर्ण केले. शार्दूल हृषिकेश, रिषभ घुबडे व दर्शन मिनियार यांनी महाराष्ट्रासाठी शेवटची पदके जिंकली. यापूर्वी अखेरचे सुवर्णपदक रूपाली गंगावणे हिने जिंकले आहे. मल्लखांब स्पर्धेत शार्दूल हृषिकेश याने पदकांचा चौकार झळकावला. आदित्य पाटील, सोहेल शेख मृगांक पाठारे यांनीही पदकांची कमाई केली आहे. ४ सुवर्ण, ४ रौप्य व ५ कांस्य पदकांची लयलूट मल्लखांब स्पर्धेत महाराष्ट्राने करून विजेतेपदही प्राप्त केले.

तब्बल २७ क्रीडा प्रकारात महाराष्ट्राने पदके जिंकण्याचा कामगिरी केली आहे. जिम्नॅस्टिक्स खेळात सर्वाधिक १२ सुवर्णांसह २४ पदके महाराष्ट्राने जिंकली आहेत. महाराष्ट्राने कौतुकास्पद कामगिरी केल्याबद्दन राज्याचे उपमुख्यमंत्री व महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार, क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे महासचिव नामदेव शिरगावकर यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *