खासदार सुनील तटकरे, प्रदीप गंधे कबड्डी संघटनेचे कामकाज पाहणार

  • By admin
  • February 15, 2025
  • 0
  • 155 Views
Spread the love

महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेने नेमली अस्थायी समिती

पुणे : महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेने महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचा कारभार सुरळित चालावा यासाठी अस्थायी समिती स्थापन केली आहे. खासदार सुनील तटकरे व प्रदीप गंधे यांच्या मार्गदर्शनाखाली ही अस्थायी समिती आगामी काळात कबड्डी संघटनेचे कामकाज पाहणार आहे.

महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्यांचा कार्यकाळ नोव्हेंबर २०२३ मध्ये संपुष्टात आला आहे. राज्य कबड्डी संघटनेच्या निवडणुकीचे प्रकरण हे न्यायप्रविष्ठ आहे. महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या घटनेतील तरतुदीनुसार खेळाडूंचे नुकसान होऊ नये म्हणून राज्यातील कबड्डी खेळासाठी एक अस्थायी समिती स्थापन करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेची नवीन कार्यकारिणी समिती स्थापित होईपर्यंत महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या मार्गदर्शनाखाली अस्थायी समिती कामकाज पाहील.

अस्थायी समितीत खासदार सुनील तटकरे, ध्यानचंद पुरस्कार प्राप्त प्रदीप गंधे, अर्जुन पुरस्कार प्राप्त अशोक शिंदे, अर्जुन पुरस्कार प्राप्त माया आक्रे, मंगल पांडे, विश्वास मोरे, अविनाश सोलवट, हौशी कबड्डी फेडरेशन ऑफ इंडिया आणि क्रीडा व युवक सेवा संचालनायल यांचा एक प्रतिनिधी या समितीत आहे.

या अस्थायी समितीचे कामकाज हे ज्येष्ठ सदस्य खासदार सुनील तटकरे, प्रदीप गंधे यांच्या मार्गदर्शनाखाली चालेल. दैनंदिन कार्यालयीन कामकाज अशोक शिंदे, माया आक्रे हे पाहतील. मंगल पांडे हे आर्थिक कामकाज पाहतील. तसेच अस्थायी समितीचे व कार्यालयीन कामकाजाचे समन्वयक म्हणून अविनाश सोलवट हे काम पाहतील. विश्वास मोरे हे कबड्डी खेळाच्या तांत्रिक समितीचे प्रमुख म्हणून काम पाहतील.

अस्थायी समिती खेळाडूंना वेळोवेळी येणाऱ्या अडचणी सोडवण्यास सहकार्य करणार आहे. तसेच केलेल्या कार्यवाहीचा अहवाल महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेला ईमेलद्वारे सादर करेल असे महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे महासचिव नामदेव शिरगावकर यांनी एका पत्राद्वारे स्पष्ट केले आहे. १२ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेने हे पत्र जारी केले आहे. या पत्राच्या प्रती उपमुख्यमंत्री व महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष अजितदादा पवार, हौशी कबड्डी फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष, सचिव, क्रीडा आयुक्त व अस्थायी समितीतील सर्व सदस्यांना पाठवण्यात आल्या आहेत.

अस्थायी समितीचे कार्यकक्षा व अधिकार

१. कबड्डी खेळाच्या राज्य अजिंक्यपद स्पर्धांचे आयोजन करणे. तसेच कबड्डी विकासासाठी आवश्यक निर्णय घेणे.

२. राष्ट्रीय संघटनेच्या मान्यतेने राष्ट्रीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाची निवड करणे.

३. शासन आयोजित विविध क्रीडा स्पर्धांसाठी योग्य व पात्र पंच तसेच मार्गदर्शक यांची नियुक्ती करणे.

४. उपरोक्त गठीत समितीस आर्थिक व्यवहार नियमास अनुसरून ग्राह्य असतील.
५. अस्थायी समिती कबड्डी खेळाचे दैनंदिन कामकाज पाहील.

६. अस्थायी समिती ही महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या कार्यकारिणी समितीच्या कार्यकक्षेत राहील. महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष व सचिव हे या समितीचे पदसिद्ध पदाधिकारी असतील.

७. उपरोक्त समिती राज्य अजिंक्यपद स्पर्धा आयोजित करताना खेळाडूंना शासनाचे मिळणारे सर्व लाभ लक्षात घेऊन तसेच शासनाच्या क्रीडा विभागाच्या शासन निर्णयाच्या अधिन राहून स्पर्धांचे आयोजन करेल. स्पर्धा संपन्न झाल्यावर यथायोग्य दस्तावेज शासनास सादर करेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *