< window.dataLayer = window.dataLayer || []; function gtag(){dataLayer.push(arguments);} gtag('js', new Date()); gtag('config', 'G-1H4537RJQY'); जामनेर येथे रविवारी नामवंत मल्ल भारतीयांशी भिडणार – Sport Splus

जामनेर येथे रविवारी नामवंत मल्ल भारतीयांशी भिडणार

  • By admin
  • February 15, 2025
  • 0
  • 52 Views
Spread the love

४०० पेक्षा अधिक रथी-महारथींमध्ये होणारी दंगल पाहण्यासाठी कुस्ती प्रेमींचा जनसागर उसळणार

जळगाव : जामनेर शहरात रविवारी (१६ फेब्रुवारी) ९ देशातील नामवंत आणि कीर्तीवंत पैलवानांसह भारतातील तब्बल ४०० पेक्षा अधिक रथी-महारथींमध्ये होणारी दंगल पाहण्यासाठी पन्नास हजारांपेक्षा अधिक कुस्ती प्रेमींचा जनसागर उसळणार आहे. नमो कुस्ती महाकुंभानिमित्त आयोजित देवाभाऊ केसरी स्पर्धेत जागतिक कीर्तीच्या खासबाग आखाड्याच्या धर्तीवर उभारण्यात आलेल्या मंचावर महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ विरुद्ध आशियाई पदक विजेता जलाल म्हजो यूब, शिवराज राक्षे जगजेता गुलहिर्मो लिमा यांच्याशी भिडण्यासाठी सज्ज झाला आहे.

भारतातील कुस्ती आयोजनाबाबत जामनेरने पुन्हा एकदा बाजी मारली आहे. जे आजवर कोणालाही जमले नाही, असे भव्य आणि दिव्य आयोजन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या पुढाकाराने रविवारी साकार होणार आहे. ही एकदिवसीय कुस्ती दंगल आपल्या वैशिष्ट्यपूर्ण आणि दिमाखदार लढतीमुळे कुस्तीप्रेमींच्या स्मरणात राहील, असा दृढ विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

महिला कुस्तीपटूंचा सन्मान

या कुस्ती आयोजनानिमित्त महिला कुस्तीलाही समान सन्मान दिला जाणार आहे. तब्बल 50 महिलांच्या कुस्त्या या मंचावर रंगणार असून स्पर्धेची सुरुवात आणि समारोप महिला कुस्तीनेच केला जाणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. कुस्तीच्या इतिहासात प्रथमच महिला कुस्तीला हा सन्मान मिळणार असल्यामुळे महिला कुस्तीपटूंमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

प्रथमच ९ देशांचे मल्ल महामुकाबल्यासाठी भारतात

या महामुकाबल्याचे खास वैशिष्ट्य म्हणजे भारताच्या कुस्ती इतिहासात प्रथमच तब्बल ९ देशांचे नामवंत महिला आणि पुरुष मल्ल एकाच मंचावर भिडणार आहेत. भारत, फ्रान्स, मोल्दोवा, उझबेकिस्तान, रोमानिया, एस्टोनिया, इराण, ब्राझील आणि जॉर्जिया या देशाचे ऑलिम्पियन, जागतिक विजेते, अर्जुन पुरस्कार विजेते, हिंद केसरी, रुस्तुम ए हिंद, भारत केसरी, महाराष्ट्र केसरी आणि उप-महाराष्ट्र केसरी असे नामांकित पैलवान सहभागी होणार आहेत. हे सुद्धा या स्पर्धेचे विशेष आकर्षण ठरणार आहे. भव्य स्पर्धेत भारतातील नामांकित महिला कुस्तीपटू परदेशी मल्लांविरुद्ध आपली ताकद आजमावणार आहेत. ट्रिपल महिला महाराष्ट्र केसरी भाग्यश्री कोळी ही एस्टोनियाच्या युरोपियन चॅम्पियन मार्टा पाजूलाशी भिडणार आहे २२ प्रमुख लढतीसोबत स्थानिक ३०० महिला आणि पुरुष पैलवानांच्याही जोरदार कुस्त्या पाहायला मिळणार आहेत.

विजेत्यांवर बक्षीसांचा वर्षाव
स्पर्धेत सहभागी खेळाडूंवर बक्षीसांचा अक्षरश: वर्षाव होणार असून विजेत्यांना रोख पारितोषिकांसह मानाची गदा आणि ‘देवाभाऊ केसरी’ हा प्रतिष्ठेचा किताब प्रदान केला जाणार आहे, अशी माहिती संयोजक हिंदकेसरी रोहित पटेल यांनी दिली. विजेत्या खेळाडूंना तीन किलो वजनाची चांदीची गदा आणि मानाचा पट्टा ही बहाल केला जाणार असून अव्वल दंगलीतील पराभूत खेळाडूलाही रोख पुरस्कार दिले जाणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *