
लिजंड्स प्रीमियर लीग : पांडुरंग गाजे सामनावीर
छत्रपती संभाजीनगर : लिजंड्स प्रीमियर लीग सिझन ३ टी २० क्रिकेट स्पर्धेत शनिवारी झालेल्या दुसऱ्या सामन्यात मीनाक्षी इंडस्ट्रीज संघाने नॉन स्ट्रायकर्स संघाचा ७३ धावांनी पराभव करत आगेकूच केली. या लढतीत पांडुरंग गाजे याने सामनावीर पुरस्कार मिळवला.

एमआयटी क्रिकेट स्टेडियमवर ही स्पर्धा रंगत आहे. मीनाक्षी इंडस्ट्रीज संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि २० षटकात आठ बाद १५१ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. या धावसंख्येचा पाठलाग करताना नॉन स्ट्रायकर्स संघ १६.२ षटकात ७८ धावांवर सर्वबाद झाला. मीनाक्षी इंडस्ट्रीज संघाने ७३ धावांनी सामना जिंकला.
या सामन्यात पांडुरंग गाजे याने २० चेंडूत ३७ धावांची आक्रमक खेळी साकारली. त्याने तीन टोलेजंग षटकार व तीन चौकार मारले. रमेश साळुंके याने अवघ्या १६ चेंडूत ३३ धावांची धमाकेदार खेळी केली. त्याने दोन उत्तुंग षटकार व चार चौकार मारले. डॉ सुनील काळे याने २३ चेंडूत २२ धावा फटकावल्या. त्याने तीन चौकार मारले.

गोलंदाजीत रणजीत याने १९ धावांत तीन विकेट घेतल्या. लहू लोहार याने २४ धावांत तीन गडी टिपले. आशिष भारुका याने प्रभावी गोलंदाजी करत अवघ्या पाच धावांत दोन बळी घेतले.
संक्षिप्त धावफलक : मीनाक्षी इंडस्ट्रीज संघ : २० षटकात आठ बाद १५१ (डॉ सुनील काळे २२, डॉ कार्तिक बाकलीवाल ४, विजय अडलाकोंडा ९, पांडुरंग गाजे ३७, संदीप फोके १९, रमेश साळुंके ३३, रणजित नाबाद ११, लहू लोहार ३-२४, सुमित आगरे १-२३, शेख सादिक १-३०, निलेश सेवेकर १-१५, अमोल दौड १-१९) विजयी विरुद्ध नॉन स्ट्रायकर्स संघ : १६.२ षटकात सर्वबाद ७८ (इरफान पठाण ६, सिद्धांत पटवर्धन १४, शेख सादिक ७, अमोल दौड १३, राजेश शिंदे १७, जी सचिन ५, रणजित ३-१९, पांडुरंग गाजे २-१९, आशिष भारुका २-५, रमेश साळुंके २-२१, राजू परचाके १-१३). सामनावीर : पांडुरंग गाजे.