अभिजित मोरेच्या तडाख्याने जे जे हॉस्पिटल उपांत्य फेरीत

  • By admin
  • February 15, 2025
  • 0
  • 17 Views
Spread the love

मुंबई : आत्माराम मोरे प्रतिष्ठानतर्फे आयोजित आत्माराम मोरे स्मृती चषक आंतर रुग्णालय टी २० क्रिकेट स्पर्धेत जे जे हॉस्पिटल संघाने दमदार खेळ करत लीलावती हॉस्पिटलचा ६ विकेट्सने पराभव केला आणि उपांत्य फेरीत दणदणीत प्रवेश केला. अभिजित मोरेच्या नाबाद अर्धशतकासह सुभाष शिवगण याने आपल्या तुफानी खेळीने जे जे हॉस्पिटल संघाला सहज विजय मिळवून दिला.

आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी व लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्या सहकार्याने सुरू असलेल्या या स्पर्धेत जे जे हॉस्पिटल संघाने नाणेफेक जिंकत लीलावती हॉस्पिटल संघाला प्रथम फलंदाजी दिली. सलामीवीर वीरेश दांडेकर (२१) व विजय नाडकर (३५) यांनी अर्धशतकी भागीदारी करत संघाला चांगली सुरुवात करून दिली. त्यानंतर कर्णधार रुपेश कोंडाळकर (३१) याने झुंजार खेळी करत संघाला १३८ धावांपर्यंत पोहोचवले.

जे जे हॉस्पिटलच्या गोलंदाजांनी अचूक मारा करत लीलावतीच्या फलंदाजांवर अंकुश ठेवला. अभिजित मोरे, प्रकाश सोळंकी, जगदीश वाघेला, राकेश शेलार व रोहित सोळंकी यांनी प्रत्येकी १ बळी घेतला.

अभिजित मोरेचा तडाखा, जे जे हॉस्पिटलची सहज आगेकूच
१३९ धावांच्या विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना सुभाष शिवगण (४३) व अभिजित मोरे (नाबाद ५६) यांनी आक्रमक सुरुवात केली. या जोडीने दमदार फलंदाजी करत १२व्या षटकातच संघाला ९३ धावांपर्यंत मजल मारून दिली. विशाल शिंदे (१-२०) व रुपेश कोंडाळकर (१-१९) यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, पण तो अपुरा ठरला. अखेर जे जे हॉस्पिटलने १८.४ षटकांत १३९ धावा फटकावत सहज विजय मिळवला.

सामनावीर अभिजित मोरे
अभिजित मोरेच्या अष्टपैलू खेळाची दखल घेत त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला, तर लीलावती हॉस्पिटलच्या कर्णधार रुपेश कोंडाळकरला उत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार मिळाला. हे पुरस्कार सेक्युर वन सिक्युरिटी कंपनीचे सीईओ अरुण माने, क्रिकेटप्रेमी वैभव मोरे व शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *