
पुणे : पुणे शहरातील बालेवाडी क्रीडा संकुलात झालेल्या १३३व्या वर्ल्ड तायक्वोंदो आंतरराष्ट्रीय क्युरोगी रेफरी परीक्षेत पुणे जिल्ह्य़ातील अनुष्का झगडे हिने उत्तम प्रकारे यश संपादन केले आहे.

भारतीय संघ प्रशिक्षक, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक आणि पीएन तायक्वांदो अकादमीचे सचिव प्रणव निवंगुणे यांनी अनुष्का झगडे हिच्या यशाचे कौतुक केले आहे. प्रणव निवंगुणे म्हणाले की, ‘हा केवळ आमच्या पीएन अकॅडमीसाठीच नाही तर संपूर्ण आपल्या तायक्वोंदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रासाठी आणि इंडिया तायक्वोंदोसाठी एक ऐतिहासिक क्षण आहे. सर्वात तरुण व आंतरराष्ट्रीय क्योरुगी पंच होणे ही आपल्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. जागतिक तायक्वांदो फेडरेशन सोबत या रोमांचक प्रवासाला सुरुवात करताना अनुष्काला मनःपूर्वक शुभेच्छा. तिचे हे यश निःसंशयपणे इतर अनेकांना प्रेरणा देईल.’
अनुष्का झगडे हिच्या या प्रवासात सर्वात महत्वाचे म्हणजे तिचे प्रशिक्षक प्रणव निवंगुणे यांचे फार मोठे योगदान आहे. प्रणव निवंगुणे हे स्वतः भारतीय तायक्वोंदो संघाचे प्रशिक्षक आहेत. तसेच अनुष्का मागील ११ वर्षांपासून त्यांच्याकडे तायक्वोंदोचे प्रशिक्षण घेत आहे.
इंडिया तायक्वोंदोचे अध्यक्ष नामदेव शिरगावकर यांचे खूप मोठे सहकार्य लाभले आहे. तसेच तायक्वोंदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे महासचिव गफ्फार पठाण व तायक्वोंदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे खजिनदार प्रसाद कुलकर्णी यांचेही मार्गदर्शन लाभले आहे, असे प्रणव निवंगुणे यांनी सांगितले.