
राष्ट्रीय शालेय सॉफ्टबॉल चॅम्पियनशिप
छत्रपती संभाजीनगर : ६८व्या राष्ट्रीय शालेय सॉफ्टबॉल अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्र, दिल्ली, छत्तीसगड, राजस्थान, चंदीगड या राज्य संघांनी उपांत्य फेरी गाठली आहे.
भारतीय क्रीडा महासंघ आणि क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद तसेच महाराष्ट्र राज्य सॉफ्टबॉल संघटना आणि छत्रपती संभाजीनगर सॉफ्टबॉल असोसिएशन यांच्या तांत्रिक सहाय्याने १४ वर्षांखालील मुला-मुलींची राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धा विभागीय क्रीडा संकुलात आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेतील सामने रंगतदार होत आहेत.

स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी दिल्ली आणि विद्याभारती यांच्या दरम्यान झालेल्या सामन्याच्या प्रसंगी एमजीएमचे जॉन, डॉ शशिकांत सिंग, भारतीय शालेय खेळ महासंघाचे अधिकारी अनिल मिश्रा, एसजीएफआयचे संजय बाबर, बाजीराव भुतेकर, जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई, क्रीडा अधिकारी लता लोंढे यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. दुपारच्या सत्रात छत्तीसगड आणि चंदीगड या संघा दरम्यान झालेल्या सामन्यावेळी संघाना शुभेच्छा देण्यासाठी भारतीय सॉफ्टबॉल संघटनेचे उपाध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य संघटना सचिव डॉ प्रदीप तळवेलकर, जिल्हा सॉफ्टबॉल संघटना सचिव गोकुळ तांदळे, परभणीचे प्रसेनजीत बनसोडे, बालाजी शिरसीकर आदी मान्यवर उपस्थित होते.

या सामन्यांसाठी पंच प्रमुख अक्षय येवले, स्वप्नील चांदेकर, आकाश सराफ, विकास वानखेडे, संतोष आवचार, रोहित तुपारे, भीमा मोरे, प्रीतीश पाटील, सतीश राठोड, प्रवीण गडख, अंकुश काळबांडे आदींनी पंच म्हणून काम पाहिले. गुणलेखक म्हणून ईश्वरी शिंदे, ईश्वरी चव्हाण, दीक्षा शिनगारे आदींनी भूमिका निभावली.

स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी रफीक जमदार, पांडुरंग कदम, किशोर चव्हाण, अनिल दांडगे, गणपत पवार, श्यामसुंदर भालेराव, गजानन कवडे, यश थोरात, गौरव साळवे, निखिल वाघमारे, श्रवण शिटे, विशाल जहारवाल, दीपक भवर, कार्तिक तांबे यांच्यासह राज्य संघटनेचे पदाधिकारी व छत्रपती संभाजीनगर जिल्हा सॉफ्टबॉल संघटनेचे सर्व पदाधिकारी आदी परिश्रम घेत आहेत.
महत्त्वाच्या सामन्यांचे निकाल
मुलांचा विभाग : दिल्ली विजयी विरुद्ध विद्याभरती (५-२) होमरन, महाराष्ट्र विजयी विरुद्ध तेलंगणा (७-०) होमरन, छत्तीसगड विजयी विरुद्ध चंदीगड (४-०) होमरन, पंजाब विजयी विरुद्ध राजस्थान (१०-०) होमरन.
मुलींचा विभाग : छत्तीसगड विजयी विरुद्ध आंध्र प्रदेश (१०-०) होमरन, राजस्थान विजयी विरुद्ध विद्याभारती (४-०) होमरन, महाराष्ट्र विजयी विरुद्ध चंदीगड (१०-०) होमरन, हरियाणा विजयी विरुद्ध दिल्ली (३-०) होमरन.