
मुंबई : महाराष्ट्राच्या महिला संघाने ७१व्या महिला राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत साखळीत सलग दोन विजय मिळवित आरामात बाद फेरी गाठली.
हरियाणा, मोरमाजरा, कर्नाल येथील आर्य कन्या गुरुकुलच्या मैदानात मॅटवर झालेल्या क गटात महाराष्ट्राच्या महिलांनी शेवटच्या साखळी सामन्यात छत्तीसगडचा ४९-३१ असा पाडाव केला. आक्रमक सुरुवात करीत विश्रांतीला २९-१४ अशी आघाडी घेतली होती. विश्रांतीनंतर त्याच जोशात खेळ करीत १८ गुणांच्या फरकाने सामना जिंकला. आम्रपाली गलांडे, मंदिरा कोमकर, पूजा यादव यांच्या चढाईच्या आक्रमक खेळाने महाराष्ट्राने हा विजय साजरा केला.
महाराष्ट्राचा बचाव या सामन्यात थोडा कमजोर पडला. गतवर्षी महाराष्ट्राच्या महिलांनी उपांत्य फेरी गाठत तृतीय क्रमांक पटकाविला होता. यावेळी महाराष्ट्राचा क गटात समावेश होती. ओडिसा, छत्तीसगड हे दोन महाराष्ट्राच्या गटात होते. या गटात महाराष्ट्र अव्वल ठरला.
पहिल्या साखळी सामन्यात महाराष्ट्राने यजमान ओडिशा संघाचा ६२-१८ असा धुव्वा उडवीत बाद फेरी गाठण्याच्या दिशेने पहिले पाऊल टाकले. ओडिशा संघाने आपल्या पहिल्याच चढाईत दोन गडी टिपत सनसनाटी निर्माण केली. पण त्यातून सावरत महाराष्ट्राने लोण देत आघाडी घेतली. पहिली ५ ते ७ मिनिटे ओडिशाने महाराष्ट्राला कडवी लढत दिली. पण पूर्वार्धात दोन लोण देत २७-१४ अशी भक्कम आघाडी घेतली. महाराष्ट्राने शेवटच्या ५ मिनिटात २लोण देत गुणांचे अर्धशतक पार केले. महाराष्ट्राने या सामन्यात एकूण ६ लोण देत सामना एकतर्फी केला. आम्रपाली गलांडे, मंदिरा कोमकर, ज्युली मिस्किटा, समरीन बुरोंडकर यांच्या चढाई पकडीच्या खेळाने महाराष्ट्राने ४४ गुणांच्या मोठ्या फरकाने सामना जिंकला.