
आत्माराम मोरे स्मृती चषक आंतर रुग्णालय टी २० क्रिकेट स्पर्धा
मुंबई : आत्माराम मोरे स्मृती चषक आंतर रुग्णालय टी २० क्रिकेट स्पर्धेत ओमकार जाधवच्या तुफानी शतकाच्या जोरावर नानावटी हॉस्पिटलने कस्तुरबा हॉस्पिटलचा २१० धावांनी धुव्वा उडवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. ओमकारच्या चमकदार खेळासह संघाने फलंदाजी आणि गोलंदाजीत वर्चस्व गाजवत ऐतिहासिक विजयाची नोंद केली.
नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीला उतरलेल्या नानावटी हॉस्पिटलने केवळ २० षटकांत ४ बाद २६६ धावांचा डोंगर उभारला. या विजयात नायक ठरला ओमकार जाधव, ज्याने ६ षटकार आणि १५ चौकारांसह अवघ्या ६० चेंडूत १३५ धावा फटकावत धडाकेबाज शतक झळकावले. त्याला प्रणव हरियान (१५ चेंडूत २४), दिनेश पवार (१२ चेंडूत नाबाद ३२) आणि किशोर कुयेस्कर (१० चेंडूत नाबाद २८) यांनी भक्कम साथ दिली.
कस्तुरबा हॉस्पिटलच्या गोलंदाजांमध्ये महेश सणगरने २१ धावांत ३ बळी घेत काहीसा प्रतिकार केला, पण तो अपुरा ठरला.
विजयासाठी २६७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कस्तुरबा हॉस्पिटल संघाची फलंदाजी अक्षरशः कोलमडली. सलामीवीर रोहन जाधव (१४ चेंडूत १७) आणि महेश सणगर (१५ चेंडूत १८) यांनी चांगली सुरुवात करत ४० धावांची भागीदारी केली. मात्र, त्यानंतर संपूर्ण संघ ५६ धावांत गारद झाला.
ओमकार जाधव याने २० धावांत ३ बळी, विशाल चतुर्वेदी याने ३८ धावांत ३ बळी, दिनेश पवार याने १ बळी घेत गोलंदाजीत कमाल केली
शतकवीर ओमकार जाधव याला सामनावीर पुरस्कार, तर कस्तुरबा हॉस्पिटलच्या महेश सणगर याला उत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा सन्मान क्रिकेटपटू संदीप गुरव, नरेंद्र चौधरी, मनोहर पाटेकर, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण आदी मान्यवरांच्या उपस्थितीत देण्यात आला.
नानावटी संघाचा दमदार विजय
या प्रचंड विजयानंतर नानावटी हॉस्पिटल संघ उपांत्य फेरीत दाखल झाला असून, आता ते स्पर्धेचे विजेतेपद पटकावण्यासाठी सज्ज झाले आहेत. ओमकार जाधवच्या जबरदस्त खेळीमुळे नानावटी हॉस्पिटल संघ आता स्पर्धेतील सर्वात प्रबळ दावेदार म्हणून पुढे आला आहे.