
आंतर शालेय खो-खो स्पर्धा
पुणे : डेक्कन एज्युकेशन आणि रमणबाग मित्र मंडळाच्या वतीने आयोजित आंतरशालेय १४ वर्षांखालील खो-खो स्पर्धेत मुलांच्या गटात यजमान न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग संघाने तर, मुलींच्या गटात अहिल्यादेवी प्रशाला संघाने विजेतेपद संपादन केले.
रमणबाग प्रशालेच्या मैदानावर पार पडलेल्या या स्पर्धेत मुलांच्या अंतिम सामन्यात न्यू इंग्लिश स्कुल रमणबाग प्रशाला संघाने म स गोळवलकर गुरुजी विद्यालयाचा १२-११ असा एक गुण आणि ३ मिनिटे ३० सेकंद राखून पराभव केला. मुलींच्या गटात अहिल्यादेवी प्रशालेने म स गोळवलकर गुरुजी विद्यालयावरच ११-१० असा एक गुण आणि ४ मिनिटे राखून पराभव केला.

मुलांच्या अंतिम लढतीत न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग संघाने नाणेफेक जिंकून प्रथम सरंक्षणाचा निर्णय घेतला. प्रणित सस्ते (१मिनिट २० सेकंद), अद्वैत सातपुते (२ मिनिट), श्रीयश महारुगडे (१.३० मिनिट) यांच्या सुरेख कामगिरीमुळे त्यांनी केवळ चार गुण गमावले. आक्रमण करताना ओम डिंगरे (३) आणि सुयश महारुगडे (२) यांच्या आक्रमणाने रमणबाग प्रशालने गोळवलकर गुरुजी विद्यालयाचे १० गडी टिपून पहिल्या डावात सहा गुणांची कमाई केली. दुसऱ्या डावात दर्शन धावलेच्या (४) धारदार आक्रमणाने गोळवलकर गुरुजी विद्यालायने ७ गुणांची कमाई केली. मात्र, त्यांना केवळ एकाच गुणाची आघाडी घेता आली. दुसऱ्या डावात रमणबागेच्या श्रीयश महारुगडे (१.५० मिनिट) आणि अनुज चव्हाणचा (१.१० मिनिट) यांचा बचाव निर्णायक ठरला. त्यांना प्रणित सस्ते याची सुरेख साथ मिळाली. त्यानंतर सुयश आणि अनुज यांनी गोळवलकर गुरुजी विद्यालयाचे दोन गडी झटपट टिपून रमणबाग प्रशालेला विजय मिळवून दिला.
मुलींच्या अंतिम लढतीत अहिल्यादेवीने प्रथम आक्रमण करताना गोळवलकर गुरुजी विद्यालयाचे दहा गडी टिपून झकास सुरुवात केली. यामध्ये प्रमुख वाटा इरा चिकणे आणि अनन्या नगरे यांचा होता. बचावात इरा चिकणे (१.४० मिनिट), अमृता हंगरगे (१.३० मिनिट), वोदश्री देशमुख (१.३० मिनिट) यांनी सुरेख पळती करत गोळवलकर गुरुजी विद्यालयाच्या आक्रमकांना निराश केले. त्यांच्या साची आडकेने तीन गडी बाद केले. पण, त्यांना केवळ पाचच गडी टिपता आले. त्यामुळे त्यांना पहिल्या डावात ५ गुणांनी पिछाडीवर रहावे लागले. फॉलोऑन मिळाल्यावरही गोळवलकर गुरुजी विद्यालय संघाला फार चमक दाखवता आली नाही. त्यांना आणखी पाच गुणांची कमाई करून बरोबरी साधली. त्यानंतर पहिल्या डावात २ मिनिटे पळती करणाऱ्या वेदिका ओकने (२.४० मिनिट) दुसऱ्या डावातही चांगली पळती केली. पण, अमृता हिने दमलेल्या वेदिकाला बाद करून अहिल्यादेवी प्रशालेच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
स्पर्धेतील विजेत्या संघाला करंडक अशी पारितोषिके प्रदान करण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष अॅड अशोक पलांडे, ज्ञानेश्वर महाराज संस्थान, आळंदीचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजन नाथ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शालेय समितीचे अध्यक्ष डॉ शरद अगरखेडकर, मुख्याध्यापिका चारुता प्रभुदेसाई, आदी मान्यवर उपस्थित होते.
इतर पारितोषिके
सर्वोत्कृष्ट आक्रमक खेळाडू : सुकृत सफार व साची आडके.
सर्वोत्कृष्ट संरक्षक खेळाडू : श्रीयश महारुगडे व वेदश्री देशमुख.
सर्वोत्कृष्ट खेळाडू : इरा चिकणे व अद्वैत सातपुते.