
रणजी ट्रॉफी उपांत्य सामना
नागपूर : ध्रुव शोरे (७४) आणि डॅनिश मालेवार (७९) यांच्या दमदार अर्धशतकांच्या बळावर विदर्भ संघाने रणजी ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेतील उपांत्य सामन्यात मुंबई संघाविरुद्ध पहिल्या दिवसअखेर पाच बाद ३०८ धावसंख्या उभारली आहे.

विदर्भ संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर अथर्व तायडे (४) स्वस्तात बाद झाला. त्यानंतर ध्रुव शोरे व पार्थ रेखाडे या जोडीने ५४ धावांची भागीदारी केली. पार्थ रेखाडे याने ६४ चेंडूत २३ धावांची चिवट खेळी केली. त्याने दोन चौकार मारले.
ध्रुव शोरे व डॅनिश मालेवार या जोडीने संयमित फलंदाजी करत अर्धशतक झळकावले. ध्रुव शोरे याने १०९ चेंडूंचा सामना करत ७४ धावांची खेळी केली. त्याने नऊ चौकार मारले. मालेवार याने १५७ चेंडूत ७९ धावांची दमदार खेळी साकारली. त्याने एक षटकार व सात चौकार मारले. या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी ५१ धावांची भागीदारी केली.
अनुभवी फलंदाज करुण नायर याने ७० चेंडूंत ४५ धावा फटकावल्या. त्याने सहा चौकार मारले. यश राठोड याने ८६ चेंडूत नाबाद ४७ धावा काढल्या. त्याने सहा चौकार मारले. कर्णधार अक्षय वाडकर याने नाबाद १३ धावा काढल्या आहेत. विदर्भ संघाने पहिल्या दिवसअखेर ८८ षटकांत पाच बाद ३०८ धावसंख्या उभारली आहे.
मुंबई संघाकडून शिवम दुबे (२-३५) व शम्स मुलाणी (२-४४) यांनी प्रभावी गोलंदाजी करत प्रत्येकी दोन गडी बाद केले. रॉयस्टन डायस याने २६ धावांत एक बळी मिळवला.
केरळ चार बाद २०६
दुसऱ्या उपांत्य सामन्यात केरळ संघाने गुजरात संघाविरुद्ध खेळताना पहिल्या डावात पहिल्या दिवसअखेर ८९ षटकात चार बाद २०६ धावा काढल्या आहेत. अक्षय चंद्रन (३०), रोहन कुन्नम्मल (३०) यांनी संघाला सुरेख सुरुवात करुन दिली. परंतु, ही सलामी जोडी लागोपाठ बाद झाली. वरुण नयनर १० धावांवर बाद झाला. जलज सक्सेना याने ३० धावांचे योगदान दिले. कर्णधार सचिन बेबी याने १९३ चेंडूत नाबाद ६९ धावांची चिवट खेळी करत डावाला आकार दिला. मोहम्मद अझरुद्दीन याने नाबाद ३० धावा काढल्या आहेत.
गुजरात संघाकडून अर्जन नागवासवाला (१-३९), प्रियजितसिंग जडेजा (१-३३, रवी बिश्नोई (१-३३) यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.