
जालना तीन बाद १५१ धावा, सातारा सर्वबाद १९०
छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे आयोजित एमसीए सीनियर निमंत्रित लीग क्रिकेट स्पर्धेत सातारा संघाला १९० धावांवर रोखल्यानंतर जालना संघाने पहिल्या डावात तीन बाद १५१ धावा काढल्या आहेत.

रामपूर येथील पाटील क्रिकेट स्टेडियमवर हा सामना होत आहे. सातारा संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ४७.४ षटकात सातारा संघ १९० धावांत सर्वबाद झाला. शिवराज माने (३६), जयेश पोळ (२९), रोहन थोरात (३१), आकाश पांडेकर (२४) आणि अजय गोडसे (३०) यांनी डावाला आकार दिला.
जालना संघाकडून कर्णधार व्यंकटेश काणे याने प्रभावी गोलंदाजी केली. व्यंकटेश काणे याने ७६ धावांत पाच विकेट घेऊन सामन्याचा पहिला दिवस गाजवला. आफ्ताफ शेख याने ५७ धावांत चार विकेट घेत व्यंकटेशला सुरेख साथ दिली. लक्ष बाबर याने २४ धावांत एक गडी बाद केला.
जालना संघाने पहिल्या डावात ४० षटकात तीन बाद १५१ धावसंख्या उभारून सामन्यावर आपले वर्चस्व निर्माण केले आहे. सलामीवीर सचिन सापा याने १२६ चेंडूंचा सामना करत नाबाद ८१ धावांची खेळी केली. सचिनने एक षटकार व दहा चौकार मारले. प्रज्ज्वल राय याने ३८ धावांचे योगदान दिले. त्याने एक षटकार व पाच चौकार मारले. समर्थ गायकवाड (११), प्रणव इंगळे (०) हे लवकर बाद झाले. आर्यन गोजे ६ धावांवर खेळत आहे.
सातारा संघाकडून कपिल जांगिड याने १४ धावांत दोन गडी बाद केले. अभिमन्यू जाधव याने ३१ धावांत एक बळी घेतला आहे.