
दिल्ली कॅपिटल्स संघावर आठ विकेट राखून मोठा विजय
वडोदरा : कर्णधार स्मृती मानधनाच्या (८१) तुफानी अर्धशतकाच्या बळावर गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने दिल्ली कॅपिटल्स संघाचा आठ विकेट राखून पराभव केला. या दणदणीत विजयासह आरसीबी संघाने स्पर्धेतील सलग दुसरा विजय साकारला. स्मृती मानधना व व्हाइट व्याट हॉज या सलामी जोडीने शतकी भागीदारी करुन सामना एकतर्फी बनवला.
पहिल्या सामन्यात विक्रमी २०२ धावसंख्या काढताना आरसीबी संघाने विक्रमी विजय संपादन केला होता. या लढतीत आरसीबी संघासमोर विजयासाठी केवळ १४२ धावांचे आव्हान होते. कर्णधार स्मृती मानधना व व्हाइट व्याट हॉज या सलामी जोडीने डावाची सुरुवात आक्रमक केली. पॉवर प्ले षटकात आरसीबी संघाने बिनबाद ५७ धावा फटकावत विजयाचा पाया भक्कमपणे रचला. त्यानंतर धमाकेदार फटकेबाजी करत या सलामी जोडीने शतकी भागीदारी करत १० षटकात बिनबाद १०२ धावा फटकावत संघाचा विजय निश्चित केला. डॅनिएल व्याट-हॉज ४२ धावांवर मोठा फटका खेळताना बाद झाली. तिने ३३ चेंडूत ७ चौकार मारले.

पहिल्या सामन्यात स्वस्तात बाद झालेल्या स्मृती मानधना हिने या लढतीत दमदार अर्धशतक ठोकून स्पर्धक संघांना मोठा इशारा दिला आहे. स्मृती मानधना हिने ४७ चेंडूत ८१ धावांची वादळी खेळी करत संघाचा विजय निश्चित केला. तिने तीन उत्तुंग षटकार व दहा चौकार ठोकत सामना गाजवला. १६व्या षटकात स्मृती बाद झाली तेव्हा आरसीबीला विजयासाठी फक्त ९ धावांची गरज होती. त्यानंतर एलिस पेरी (७) व रुचा घोष (नाबाद ११ ) यांनी संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. अरुंधती रेड्डी व शिखा पांडे यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. आरसीबीने १६.२ षटकात दोन बाद १४६ धावा फटकावत सामना जिंकला. रिचा घोषने विजयी षटकार ठोकला.
दिल्ली कॅपिटल्स सर्वबाद १४१
दिल्ली कॅपिटल्स संघाने प्रथम फलंदाजी करताना १९.३ षटकांत १४१ धावसंख्या उभारली. गतविजेत्या आरसीबीकडून रेणुका ठाकूर आणि जॉर्जिया वेअरहॅम यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेत दिल्लीला मोठी धावसंख्या करण्यापासून रोखले. दिल्लीकडून जेमिमा रॉड्रिग्जने २२ चेंडूत सर्वाधिक ३४ धावा केल्या. जेमिमा आणि कर्णधार मेग लॅनिंग यांच्यातील भागीदारी शिवाय दिल्लीसाठी दुसरी कोणतीही भागीदारी होऊ शकली नाही. रेणुका आणि जॉर्जिया व्यतिरिक्त, आरसीबीकडून किम गार्थ आणि एकता बिश्त यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.
आरसीबी संघाची कर्णधार स्मृती मानधना हिने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध आरसीबीने चांगली सुरुवात केली आणि पहिल्याच षटकात त्यांना सुरुवातीचा धक्का दिला. पहिल्याच षटकात शेफाली वर्माने तिची विकेट गमावली आणि रेणुका सिंगने तिला स्मृती मानधनाकडे झेलबाद करून तिचा डाव संपवला. तथापि, यानंतर जेमिमा रॉड्रिग्ज आणि लॅनिंगमध्ये चांगली भागीदारी झाली. सहा षटकांच्या अखेरीस दिल्लीने एका विकेटच्या मोबदल्यात ५५ धावा केल्या होत्या. रॉड्रिग्ज आणि लॅनिंग यांनी दुसऱ्या विकेटसाठी ५९ धावांची भागीदारी केली.
सुरुवातीच्या विकेट घेतल्यानंतर आरसीबीच्या गोलंदाजांना पॉवरप्लेमध्ये दुसरे यश मिळवता आले नाही. परंतु दिल्लीचा आनंद फार काळ टिकला नाही. दिल्लीची फलंदाजी डळमळीत झाली आणि त्यांनी १०० पेक्षा कमी धावांमध्ये पाच विकेट गमावल्या. शेफाली वर्मा बाद झाल्यानंतर जेमिमा रॉड्रिग्ज आणि मेग लॅनिंग यांच्यातील भागीदारीमुळे दिल्लीचा डाव थोडा सावरला. पण पॉवरप्लेमध्ये दोन्ही फलंदाजांनी आपले बळी गमावले आणि डाव डळमळीत झाला. जेमिमा २२ चेंडूत चार चौकार आणि दोन षटकारांसह ३४ धावा काढल्यानंतर बाद झाली, तर कर्णधार मेग लॅनिंगने १९ चेंडूत तीन चौकारांसह १७ धावा केल्या. अॅनाबेल सदरलँड १९ धावा काढून बाद झाली आणि जेस जोनासेन एक धाव काढून बाद झाली. दरम्यान, सारा ब्राइसने २३ धावांचे योगदान दिले आणि शिखा पांडेने १४ धावांचे योगदान दिले.