
रणजी करंडक उपांत्य सामना : पार्थ रेखाडेचे १६ धावांत तीन विकेट
नागपूर : रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत उपांत्य सामन्यात विदर्भ संघाविरुद्ध खेळताना बलाढ्य मुंबई संघाने दुसऱ्या दिवसअखेर सात बाद १८८ धावा काढल्या आहेत. मुंबई संघ अद्याप १९५ धावांनी पिछाडीवर आहे. विदर्भ संघाने फलंदाजी व गोलंदाजी या दोन्ही क्षेत्रात दमदार कामगिरी बजावत वर्चस्व गाजवले आहे.
मुंबई संघाने पहिल्या डावात दुसऱ्या दिवसअखेर ५९ षटकांच्या खेळात सात बाद १८८ धावा काढल्या आहेत. आकाश आनंद याने सर्वाधिक ६७ धावा फटकावल्या आहेत. सिद्धेश लाड (३५), कर्णधार अजिंक्य रहाणे (१८), शार्दुल ठाकूर (३७) यांनी आपले योगदान दिले. आयुष म्हात्रे (९) लवकर बाद झाल्यानंतर मुंबई संघाने ठराविक अंतराने आपल्या विकेट गमावल्या. त्यामुळे विदर्भ संघाने सामन्यावर आपली पकड अधिक घट्ट केली आहे.
कर्णधार अजिंक्य रहाणे २४ चेंडूत १८ धावा काढून तंबूत परतला. त्याने चार चौकार मारले. सूर्यकुमार यादव (०), शिवम दुबे (०) या अनुभवी फलंदाजांकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. परंतु, दोघांनाही धावांचे खाते उघडता आले नाही. शम्स मुलाणी केवळ ४ धावांवर बाद झाला. अनुभवी फलंदाज स्वस्तात बाद झाल्याचा फटका मुंबई संघाला बसला. शार्दुल ठाकूर याने अनेकदा मुंबई संघाला संकटातून बाहेर काढले आहे. शार्दुल याने ४१ चेंडूत ३७ धावा फटकावल्या. त्याने एक षटकार व चार चौकार मारले. शार्दुल मोठी खेळी करेल असे वाटत असताना यश ठाकूर याने शार्दुलची विकेट घेत मुंबई संघाची स्थिती बिकट केली. तनुश कोटियन ५ धावांवर खेळत आहे.
विदर्भ संघाकडून पार्थ रेखाडे याने १६ धावांत तीन विकेट घेऊन मुंबईची स्थिती दयनीय केली. यश ठाकूर याने ५६ धावांत दोन बळी घेतले. दर्शन नळकांडे (१-४०) व हर्ष दुबे (१-५१) यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला आहे. पार्थ रेखाडे याने सुर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि अजिंक्य रहाणे अशा तीन महत्त्वाच्या विकेट घेऊन विदर्भ संघाला सामन्यावर वर्चस्व मिळवून दिले.
तत्पूर्वी, विदर्भ संघाने पहिल्या डावात १०७.५ षटके फलंदाजी करत सर्वबाद ३८३ धावसंख्या उभारली. ध्रुव शोरे (७४), डॅनिश मालेवार (७९), करुण नायर (४५), यश राठोड (५४), अक्षय वाडकर (३४), हर्ष दुबे (१८), नचिकेत बुते (११), दर्शन नळकांडे (१२), पार्थ रेखाडे (२३) यांनी आपले योगदान देत संघाची स्थिती भक्कम केली.
मुंबई संघाकडून शिवम दुबे याने ४९ धावांत पाच विकेट घेतल्या. शम्स मुलाणी (२-६२) व रॉयस्टन डायस (२-४८) यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. शार्दुल ठाकूर (१-७८) याने एक बळी घेतला.
केरळ सात बाद ४१८ धावा
अहमदाबाद येथे सुरू असलेल्या उपांत्य सामन्यात केरळ संघाने गुजरात संघाविरुद्ध खेळताना दुसऱ्या दिवसअखेर १७७ षटकात सात बाद ४१८ धावसंख्या उभारली आहे. मधल्या फळीतील फलंदाज मोहम्मद अझरुद्दीन याने नाबाद १४९ धावा फटकावत संघाची स्थिती भक्कम केली. त्याने ३०३ चेंडूंचा सामना करताना १७ चौकार मारले. सलमान निजार (५२), सचिन बेबी (६९) यांनी अर्धशतके ठोकली. अक्षय चंद्रन (३०), रोहन कुन्नम्मल (३०), जलज सक्सेना (३०), अहमद इम्रान (२४) यांनी आपले योगदान दिले. आदित्य सरवटे (१०) व मोहम्मद अझरुद्दीन (१४९) ही जोडी खेळत आहे.
गुजरात संघाकडून अर्जन नागवासवाला याने ६४ धावांत तीन विकेट घेतल्या आहेत. प्रियजितसिंग जडेजा (१-५८), रवी बिश्नोई (१-७४), विशाल जयस्वाल (१-५७) यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.