
यश राठोडचे दुसऱ्या डावातही अर्धशतक, मुंबई सर्वबाद २७०
नागपूर : रणजी उपांत्य सामन्यात विदर्भ संघाने मुंबई संघाचा पहिला डाव २७० धावांवर रोखून पहिल्या डावात ११३ धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली आहे. त्यानंतर विदर्भ संघाने दुसऱ्या डावात चार बाद १४७ धावसंख्या उभारली. तिसऱ्या दिवसअखेर विदर्भ संघ २६० धावांनी आघाडीवर आहे.
विदर्भ संघाने पहिल्या डावात १०७.५ षटके फलंदाजी करत सर्वबाद ३८३ धावसंख्या उभारली. त्यात डॅनिश मालेवार (७९), ध्रुव शोरी (७४), यश राठोड (५४), करुण नायर (४५), अक्षय वाडकर (३४) यांचा मोलाचा वाटा राहिला. मुंबई संघाकडून शिवम दुबे याने ४९ धावांत पाच विकेट घेतल्या.
मुंबई संघाचा पहिला डाव ९२ षटकात २७० धावांवर संपुष्टात आला. सलामीवीर आकाश आनंद याने दमदार शतक ठोकले. आकाशने १०६ धावा काढल्या. त्यानंतर सिद्धेश लाड (३५), शार्दुल ठाकूर (३७), तनिश कोटियन (३३) यांनी आपले योगदान दिले. अजिंक्य रहाणे (१८), सूर्यकुमार यादव (०), शिवम दुबे (०) हे आघाडाची फलंदाज स्वस्तात बाद झाल्याचा फटका मुंबई संघाला बसला. विदर्भ संघाकडून पार्थ रेखाडे याने ५५ धावांत चार गडी बाद केले. यश ठाकूर (२-७३), हर्ष दुबे (२-६८) यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले.
विदर्भ संघाच्या दुसऱ्या डावाची सुरुवात खराब झाली. अथर्व तायडे (०), ध्रुव शोरी (१३), करुण नायर (६) हे भरभवाचे फलंदाज लवकर बाद झाले. डॅनिश मालेवार याने २९ धावांची खेळी केली. यश राठोड याने दुसऱ्या डावातही अर्धशतक ठोकत डाव सावरला. यश राठोड याने १०१ चेंडूत नाबाद ५९ धावा फटकावताना चार चौकार मारले. कर्णधार अक्षय वाडकर याने १०२ चेंडूंचा सामना करत नाबाद ३१ धावांची चिवट खेळी केली आहे. त्याने दोन चौकार मारले. यश आणि अक्षय या जोडीने पाचव्या विकेटसाठी नाबाद ९१ धावांची भागीदारी केल्यामुळे विदर्भ संघ तिसऱ्या दिवसअखेर भक्कम स्थितीत पोहोचला.
मुंबई संघाकडून शम्स मुलाणी याने ५० धावांत दोन विकेट घेतल्या. शार्दुल ठाकूर (१-१४) व तनुश कोटियन ऑ(१-३३) यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.