
यूपी वॉरियर्स संघावर सात विकेटने मात; मेग लॅनिंगचे आक्रमक अर्धशतक
वडोदरा : कर्णधार मेग लॅनिंगच्या आक्रमक ६९ धावांच्या खेळीच्या बळावर दिल्ली कॅपिटल्स संघाने महिला प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत यूपी वॉरियर्स संघावर सात विकेट राखून दणदणीत विजय साकारला. शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या हा रोमहर्षक सामना दिल्लीने जिंकला.
शफाली वर्मा (२६) आणि मेग लॅनिंग या सलामी जोडीने आक्रमक फटकेबाजी करत ६५ धावांची भागीदारी करत संघाच्या विजयाचा पाया भक्कमपणे रचला. शेफाली हिने १६ चेंडूत २६ धावा फटकावल्या. तिने एक षटकार व तीन चौकार मारले. कर्णधार मेग लॅनिंग हिने अवघ्या ४२ चेंडूत ६९ धावांची दमदार खेळी करत संघाचा विजय निश्चित केला. तिने १२ चौकार मारले. जेमिमा रॉड्रिग्ज (०) लवकर बाद झाली. त्यानंतर अॅनाबेल सदरलँड (नाबाद ४१) व मॅरिझॅन कॅप (नाबाद २९) यांनी एक चेंडू बाकी असताना संघाला रोमहर्षक विजय मिळवून दिला. सोफी एक्लेस्टोन (१-३१), दीप्ती शर्मा (१-२७) व ग्रेस हॅरिस (१-११) यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

यूपी वॉरियर्स १६६ धावायूपी वॉरियर्स संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात सात बाद १६६ धावसंख्या उभारली. सलामीवीर किरण नवगिरे हिने अवघ्या २७ चेंडूत ५१ धावांची वादळी खेळी साकारली. किरण हिने आपल्या धमाकेदार खेळीत ३ उत्तुंग षटकार व ६ चौकार ठोकले. त्यानंतर श्वेता सेहरावत हिने ३३ चेंडूत ३७ धावा फटकावत डावाला आकार दिला. तिने एक षटकार व चार चौकार मारले. चिनेल हेन्री हिने अवघ्या १५ चेंडूत नाबाद ३३ धावा काढल्या. तिने ३ षटकार व ३ चौकार मारले. चिनेलच्या स्फोटक खेळीमुळे यूपी संघाला १६६ धावसंख्या उभारण्यात यश आले.
दिल्ली संघाकडून अॅनाबेल सदरलँड हिने २६ धावांत दोन विकेट घेतल्या. कॅप, जोनासेन, अरुंधती रेड्डी व मिन्नू मणी यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला.