
पुरुष आणि महिला संघांत चुरशीची लढत पाहायला मिळणार
मुंबई : कबड्डी प्रेमींसाठी आनंदाची बातमी ! येत्या २३ ते २६ फेब्रुवारी दरम्यान हिंदुहृदयसम्राट चषक जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विभाग क्रमांक ६, शाखा क्रमांक १७० आणि १७१ यांच्या संयुक्त विद्यमाने दत्तात्रय संघ, चुनाभट्टी यांच्यावतीने ही प्रतिष्ठेची स्पर्धा भरवण्यात येणार आहे. स्पर्धेतील सामने साई मंदिर पटांगण, व्ही एन पुरव मार्ग, चुनाभट्टी येथे होणार आहेत.
या स्पर्धेचे आयोजन रवी म्हात्रे आणि विधानसभा प्रमुख मनीष मोरजकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले असून, मलकित सिंग संधु (शाखा प्रमुख, शाखा क्रमांक १७०) आणि प्रकाश ग साळुंके (शाखा प्रमुख, शाखा क्रमांक १७१) यांनी विशेष पुढाकार घेतला आहे.
या स्पर्धेत प्रथम श्रेणी पुरुष गट आणि महिला गटातील नामवंत संघ सहभागी होणार आहेत. पुरुष गटात उत्कर्ष, सत्यम, चेंबुर क्रीडा केंद्र, टागोर नगर मित्र मंडळ, स्वस्तिक, शूर संभाजी, अंबिका, ओवळी, अमरज्योत, श्री साई हे संघ मैदान गाजवणार आहेत. महिला गटात स्वराज्य, महात्मा फुले, सत्यम, स्नेहविकास, नवशक्ती, महात्मा गांधी हे बलाढ्य संघ एकमेकांना तगडे आव्हान देतील.
आकर्षक बक्षिसे आणि सन्मान
मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने होणाऱ्या या स्पर्धेत विजेत्यांसाठी भरघोस बक्षिसांची लयलूट करण्यात आली आहे. पुरुष गटातील विजेत्या संघाला १० हजार रुपये रोख व हिंदुहृदयसम्राट चषक, उपविजेत्या संघाला ७ हजार रुपये रोख व ट्रॉफी देण्यात येईल. तसेच महिला गटातील विजेत्या संघास ८ हजार रुपये रोख आणि हिंदुहृदयसम्राट चषक, उपविजेत्या संघाला ५ हजार रुपये रोख व ट्रॉफी देण्यात येणार आहे. याशिवाय सर्वोत्तम पकडपटू, चढाईपटू आणि अष्टपैलू खेळाडूंना खास पारितोषिके दिली जाणार आहेत. स्पर्धेतील सर्व सामने मॅटवर खेळवले जातील, त्यामुळे वेगवान आणि रोमांचक खेळ पाहायला मिळणार आहे.
चुनाभट्टी येथे रंगणाऱ्या या थरारक स्पर्धेचा साक्षीदार होण्यासाठी कबड्डीप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. कबड्डीचा जल्लोष मुंबईत गाजवण्यासाठी खेळाडू सज्ज झाले आहेतच.