
मुंबई : को-ऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियन मुंबईच्या ६५ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय आंतर को-ऑपरेटिव्ह बँक टेनिस क्रिकेट स्पर्धेचा सलामी सामना मंत्रालय को-ऑपरेटिव्ह बँकेने अवघ्या एका धावेच्या फरकाने जिंकला.
मंत्रालय बँकेच्या ४ बाद ३५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना एसटी को-ऑपरेटिव्ह बँकेचा डाव ४ षटकात २ बाद ३४ धावसंख्येवर संपुष्टात आला. नागेश भागवतकरच्या ९ चेंडूत १९ धावांच्या झंझावाती खेळीने मंत्रालय बँकेचा विजय सुनिश्चित केला.
या स्पर्धेचे उद्घाटन युनियनचे सल्लागार कॅप्टन अभिजीत अडसूळ, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक, कोकण मर्कंटाईल को-ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष असिफ दादन, उपाध्यक्ष असगर दबिर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अकबर युसुफ कोंडकरी यांच्या उपस्थितीत झाले. मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, पुणे, नाशिक, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी आदी जिल्ह्यांतील ३९ सहकारी बँक संघांचा सहभाग या स्पर्धेत आहे.
दुसऱ्या सामन्यात एनकेजीएसबी बँकेने डहाणू को-ऑपरेटिव्ह बँकेचा २९ धावांनी पराभव केला. मोहितने एका षटकात ६ उत्तुंग षटकारांसह नाबाद अर्धशतक झळकावले. मयूर गोलतकरच्या २ धावांत ४ बळींच्या भेदक माऱ्याने संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली.
तिसऱ्या सामन्यात म्युनिसिपल बँकेने कोकण मर्कंटाईल को-ऑपरेटिव्ह बँकेचे ३१ धावांचे आव्हान ३ बाद ३२ धावा फटकावून पूर्ण केले. विजयी संघाच्या वैभव जाधवने ११ चेंडूत १६ धावा केल्या.
जीएस महानगर बँकेने अपना सहकारी बँकेविरुद्ध ३ बाद ३६ धावांचे आव्हान उभे केले. प्रवीण सोमवंशीच्या ८ चेंडूत १६ धावांच्या खेळीमुळे हा टप्पा साध्य झाला. अपना बँकेचा डाव मर्यादित षटकात ५ बाद ३१ धावसंख्येवर रोखत जीएस महानगर बँकेने ५ धावांनी शानदार विजय मिळवला.