
जळगाव फुटबॉल चषक स्पर्धा
जळगाव : जळगाव स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे आयोजित पहिल्या जळगाव फुटबॉल चषक स्पर्धेत ईगल भुसावळ, जळगाव स्पोर्ट्स फुटबॉल अकॅडमी, विदर्भ इलेव्हन बुलढाणा व अमरावती टायटन हे संघ उपांत्य फेरीत पोहोचले आहेत.
शनिवारी या संघात उपांत्य व अंतिम फेरीचा सामना होईल. पहिल्या जळगाव फुटबॉल चषकाचा मानकरी कोण ठरेल याची मोठी उत्सुकता जळगावकरांना लागलेली आहे. शनिवारी सकाळी ९ ते १२ व दुपारी ३ ते ६ या वेळेत श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल जळगाव येथे उपांत्य सामने व अंतिम सामना होणार आहे. या सामन्यांना फुटबॉलप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जळगाव स्पोर्ट्स अकॅडमीचे फारुक शेख यांनी केले आहे.
शुक्रवारी झालेल्या सामन्यांना राष्ट्रीय पोलिस दलातील खेळाडू पोलिस उपनिरीक्षक भास्कर पाटील, मलिक फाउंडेशन आणि राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष नदीम मलिक, हॉकी महाराष्ट्राच्या उपाध्यक्ष प्रोफेसर अनिता कोल्हे, जळगावचे नामांकित वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मंदार पंडित, राष्ट्रीय खेळाडू अरबाज खान यांच्या हस्ते नाणेफेक करण्यात आली व खेळाडूंना शुभेच्छा देण्यात आल्या.
शुक्रवारी झालेल्या सामन्यात धुळे संघाने अमरावती गॅलेक्सी संघाचा २-० असा पराभव केला. ईगल भुसावळ संघाने महाराष्ट्र युनायटेड बुलढाणा संघावर १-० अशी मात केली. विदर्भ इलेव्हन बुलढाणा संघाने धुळे संघाला १-० ने पराभूत केले. अमरावती टायटल संघाने उस्मान युनायटेड भुसावळ संघावर पेनल्टीवर ५-४ असा विजय नोंदवला.