
कर्णधार व्यंकटेश काणे, शतकवीर मेघ वडजे, अफताफ शेख, रामेश्वर दौडची लक्षवेधक कामगिरी
छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे आयोजित एमसीए सीनियर निमंत्रित लीग क्रिकेट स्पर्धेत जालना संघाने साऊथ झोन संघावर नऊ विकेट राखून दणदणीत विजय नोंदवत आगेकूच केली. जालना संघाचा कर्णधार व्यंकटेश काणे याने अष्टपैलू कामगिरी नोंदवत सामनावीर किताब संपादन केला. मेघ वडजेची शतकी खेळी या सामन्याचे खास वैशिष्ट्य ठरली.

बिडकीन क्रिकेट मैदानावर जालना व साऊथ झोन यांच्यात सामना झाला. या सामन्यात कर्णधार व्यंकटेश काणेच्या प्रभावी गोलंदाजीमुळे जालना संघाने सामन्यावर वर्चस्व गाजवले. व्यंकटेश काणे याने ५७ धावांत सहा विकेट घेत सामना गाजवला. व्यंकटेश काणे याने या सामन्यात एकूण नऊ विकेट घेतल्या. मेघ वडजे याने १०५ चेंडूत ११३ धावांची धमाकेदार खेळी करत संघाची स्थिती भक्कम केली.

मेघ याने तुफानी फलंदाजी केली. त्याने आपल्या शतकी खेळीत तब्बल आठ टोलेजंग षटकार व बारा चौकार ठोकले. साऊथ झोन संघाच्या विवेक अनाची याने बारा चौकारांसह ६३ धावा फटकावल्या. जालना संघाच्या प्रज्ज्वल राय याने ४२ चेंडूत सात चौकारांसह ५० धावा काढल्या. गोलंदाजीत जालना संघाच्या अफताफ शेख याने ३४ धावांत चार विकेट घेत व्यंकटेश काणे याला सुरेख साथ दिली. श्री याने ४७ धावांत तीन गडी बाद केले. जालना संघास आंतरराष्ट्रीय क्रिकेट प्रशिक्षक राजू काणे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

संक्षिप्त धावफलक : साऊत झोन : पहिला डाव : ४७ षटकात सर्वबाद २१० (पुष्कराज खराडे १४, विवेक अनाची ६३, राजवीर जगताप २४, नेत्रदीप वैद्य नाबाद १७, निखिल पाटील ३२, विवेक कवठेकर १५, इतर २४, व्यंकटेश काणे ६-५७, शोएब सय्यद ३-३८, रामेश्वर दौड १-२६).
जालना संघ : पहिला डाव : ५८.१ षटकात सर्वबाद २८१ (आर्यन गोजे २१, लक्ष बाबर ४७, व्यंकटेश काणे ३३, मेघ वडजे नाबाद ११३, रामेश्वर दौड २९, ओंकार पातकळ ८, निखिल पाटील ३-४१, दीप पंजा २-५०, पुष्कराज खराडे २-२६, श्री ३-४७).
साऊथ झोन : दुसरा डाव : २६.५ षटकात सर्वबाद १५१ (पुष्कराज खराडे २४, ऋषिकेश महाडिक ३९, राजवीर जगताप १८, श्री १५, विवेक कवठेकर १६, निखिल पाटील १५, निहाल शेख नाबाद ७, व्यंकटेश काणे ३-४८, आफताफ शेख ४-३४, रामेश्वर दौड ३-४७).
जालना संघ : दुसरा डाव : १४.२ षटकात एक बाद ८४ (प्रज्ज्वल राय नाबाद ५०, सचिन सापा ३, लक्ष बाबर नाबाद १९, निखिल पाटील १-३६). सामनावीर : व्यंकटेश काणे.