
अप्पर जिल्हाधिकारी शैलेश सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत गौरव सोहळा
बीड : बीड जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि तायक्वांदो असोशिएशन ॲाफ बीड यांच्या संयुक्त विद्यमाने उत्तराखंड येथे झालेल्या ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक जिंकल्याबद्दल नयन अविनाश बारगजे हिचा सत्कार अप्पर जिल्हाधिकारी शैलेश सूर्यवंशी आणि शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त प्रा जे पी शेळके यांच्या हस्ते पुष्पहार घालून व मानचिन्ह देऊन करण्यात आला.
जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या सत्कार समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून अप्पर जिल्हाधिकारी शैलेश सूर्यवंशी, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त प्रा जे पी शेळके यांच्यासह डॉ अविनाश बारगजे, प्रा दिनकर थोरात, जया बारगजे यांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तायक्वांदो असोशिएशन ॲाफ महाराष्ट्र मुंबई संघटनेचे अध्यक्ष डॉ अविनाश बारगजे यांनी केले. अप्पर जिल्हाधिकारी शैलेश सूर्यवंशी, प्रा जे पी शेळके, जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर यांनी मार्गदर्शन केले.
उत्तराखंड येथे पार पडलेल्या ३८ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत तायक्वांदो क्रीडा प्रकारात ४९ किलो वजन गटात रौप्यपदक विजेत्या नयन बारगजे हिचा पुष्पहार घालून व मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी पाहुण्यांच्या उपस्थितीत तायक्वांदो खेळाची सेल्फ डिफेन्स, रोड फाईट, पुमसे, फाईट आदी प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय बीड व तायक्वांदो असोशिएशन ॲाफ बीड यांच्याकडून हा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.
यावेळी राष्ट्रीय खेळाडू यशस्वी चव्हाण, कार्तिकी मिसाळ, ओंकार परदेशी, श्रवण तांबारे, सार्थक भाकरे व सिद्धी मिसाळ या राष्ट्रीय खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे क्रीडा अधिकारी कालिदास होसूरकर, क्रीडा मार्गदर्शक अविनाश पाटील, क्रीडा मार्गदर्शक सतीश राठोड, योगेश करांडे, जितू आराक आदी सर्व अधिकारी, तायक्वांदो खेळाडू व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.